खरबी पेंच कार्यालयातील प्रकारपुंडलिक हिवसे खरबी भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी परिसरात धान पिकासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. या परिसरातील सुमारे ५०० शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाच्या खरबी कार्यालयावर हल्लाबोल करुन पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान, एका शेतकऱ्याने घरुनच गळफास घेऊन या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील महिनाभरापासून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी या परिसरातील शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाच्या कार्यालयाला निवेदन दिले. मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नाही. शासनाच्या नियमानुसार ‘टेल टू हेड’ असे पाणी वितरणाचे नियम असूनही ‘हेड टू टेल’ याप्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. खरबी परिसरामध्ये येणाऱ्या खराडी, राजेदहेगाव, परसोडी, नांदोरा, ठाणा परिसरामधील धान पीक पाण्याअभावी करपू लागले आहेत. मागील वर्षी राजदहेगाव, खराडी, नांदोरा येथील धानपिक पाण्याअभावी करपले होते. त्यामुळे राजेदहेगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन करुन गाव दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी बाध्य केले होते. यावर्षीही असाच प्रकार असतानाही पेंच प्रकल्पाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज ५०० शेतकऱ्यांनी या कार्यालयावर मोर्चा नेला. एका शेतकऱ्याने गळफास लावण्याच्या प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे तो टळला. सायंकाळपर्यंत पाणी नांदोरा, राजेदहेगाव टेलवर न पोहचल्यास आत्मदहन करण्याच्या इशाराही शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग सहायक अभियंता डी. एच. गायधने यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला पेंच प्रकल्पाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे अन्यथा आंदोलन करण्यात येईल. सरकार शेतकऱ्यांचे असुनसुध्दा शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, याची खंत वाटत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम यांनी व्यक्त केली.धानाला परिसरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी रात्री ११.३० वाजता गेले असता त्यांना काही शेतकऱ्यानी शस्त्रे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ते परत आले. असे असले तरी या शेतकऱ्यांना पाणी पुरविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.- डी.एच. गायधने, सहायक अभियंतापेंच पाटबंधारे विभाग शाखा खरबी.यावर्षी अत्यल्प पावसामुळे धानपीक संकटामध्ये आहे. यासाठी मी या वारंवार कार्यालयाला भेटी देऊनसुध्दा शेतकऱ्यांना पाणी पुरविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे अधिकारी असमर्थ ठरले आहे. दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल.- चंद्रप्रकाश दु्ररुगकर, जि.प. सदस्य ठाणा
पाण्यासाठी शेतकऱ्याचा हल्लाबोल
By admin | Published: October 10, 2015 12:55 AM