रोंघा, पीटेसूर, गोवारी टोला ही गावे अंबागड जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येतात. या गावांच्या परिसरात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र नाही. तसेच ही गावे दुसऱ्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राला अजूनपर्यंत जोडली गेलेली नाहीत. त्यामुळे येथील शेतकरी धानाची विक्री शासकीय धान खरेदी केंद्रावर करू शकत नाहीत. परिणामी सदर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी किमतीत धानविक्री करावी लागत आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीकडे अद्यापही लक्ष दिले नाही.
शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान्याची पोती मोठ्या संख्येने पडून आहे. येथे बारदान उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. गोदाम हाऊसफुल झाले आहे. खरेदी केंद्रावर धान पोत्यांचा वजनकाटा झाला नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता आहे. धान पोती ओलीचिंब होऊन धानाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरवर्षी संबंधित विभाग नियोजन करण्याचा दावा करते; परंतु प्रत्यक्षात वेगळ्या परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. तालुका धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. धान विक्री करणे व त्यानंतर त्याचा मोबदला मिळण्याकरिता शेतकऱ्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागते. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी करण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. सर्वसामान्यांची धानाची मोजणी होत नाही, अशीही ओरड आहे.
बॉक्स
धानाच्या खरेदीसाठी योग्य नियोजन हवे
ऑनलाईन सातबारा जमा करणे, तो खरेदी केंद्रावर नेऊन देणे, धान्याची पोती नेऊन ठेवणे अशा अग्निदिव्यातून शेतकऱ्यांना जावे लागते. त्यात बराच मानसिक त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी शासनाकडून सहज, सोप्या पद्धतीचा अवलंब केला गेल्याचा गाजावाजा करण्यात येतो; परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती दिसत नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाची सहज विक्री करता यावी याकरिता नियोजनाची गरज आहे.