करडी(पालोरा) : राज्यात हवामान खात्याने आणखी चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तर दहा दिवसानंतर परतीचा पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. करडी परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून संततधार पाऊस होत आहे. गणेशोत्सवात पावसाचा जोर कमी होईल, अशी अपेक्षा असताना मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. विजेच्या कडकडाटांसह होणारी जोरदार वृष्टी परिपक्व अवस्थेतील हलके धान जमिनीवर लोटून नुकसानग्रस्त होण्यास कारणीभूत ठरत आहे.
मोहाडी तालुक्यात १ जून ते २१ सप्टेंबर या कालावधीत १३०२.१ मिलिमीटर (११३ टक्के) पाऊस झाला आहे. करडी परिसरात १०५२ मिलिमीटर (९१ टक्के), वरठी १०९१.२ मिलिमीटर (९५ टक्के), कांद्री १०८८ मिलिमीटर (९४ टक्के), कान्हळगाव ११४४.२ मिलिमीटर (९९ टक्के), आंधळगाव क्षेत्रात ११२३ मिलिमीटर म्हणजे ९७ टक्के पाऊस झाला आहे.
यावर्षी सरासरी खंडित पाऊस झाल्याने एकदाही पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही. शेवटच्या टप्प्यात लघु व मध्यम तलावांतील जलसाठ्यात मोठी वाढ झालेली असली तरी तलाव ओव्हरफ्लो झालेले नाहीत. वेळीच पाऊस न थांबल्यास हाती आलेले धान वाया जाण्याची भीती सतावत आहे. किड व विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने भारी धानही नुकसानग्रस्त होण्याचा धोका आहे. नाल्यांवरील तुटलेल्या स्थितीतील बांधबंधारे शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची प्रतीक ठरताहेत. परंतु याकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहेत.
पेरवा व गादचे प्रमाण वाढले
हलके धान फुटले असून परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. गणेशोत्सवादरम्यान निसर्ग सारखा बरसत आहे. फुलोऱ्यादरम्यान पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात धान लोंबीतील ताणे पोचट आहेत. पिकांमध्ये पांढन्या (पेरवा) लोंबी दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे उत्पादन न देणाऱ्या गाद धानाचे प्रमाण वाढल्याने शेतीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
रोड-रस्ते उखडल्याने वाहतूकदार त्रस्त
करडी परिसरातील रोड -रस्त्यांचे बेहाल झाले आहे. खोल खड़े, उखडलेले पोच मार्ग, रस्त्यांवर साचलेने चिखल वाहतुकदारांसाठी जीवघेणे ठरू पाहत आहेत. अनेक रस्ते मातीमोल ठरले असून पांदण रस्त्यांसारखे दीड ते दोन फुटाचे खोल खड्डे व आडव्या नाल्या पडल्या आहेत. वाहनचालकांना रस्ते यमदूतांसारखे भासत आहेत. राज्य मार्ग, जिल्हा व ग्रामीण मार्गाची पार वाईट दशा झालेली असतांना पर्याप्त निधीची कमतरता सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुखणे वाढविणारी बाब ठरत आहे.
कोट बॉक्स
''यावर्षी शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके तसेच मशागतीच्या खर्चाने बेजार केले. महागाई सातत्याने वाढत असताना शेतमालाच्या किमती मात्र, अजूनही ''जैसे थे''च आहेत. त्यातच निसर्गाचा प्रकोप पाठ सोडण्यास तयार नसल्याने उत्पादन व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. शासनाने शेतकरी हिताचे धोरण राबविण्याची गरज आहे.
-धामदेव वनवे, शेतकरी ढिवरवाडा .
210921\img_20210921_124932.jpg~210921\img_20210921_124606.jpg
संततधार पावसाने शेतकरी संकटात~पालोरा ते खमारी रस्ता असा मातीत दबला आहे