तुमसर-बपेरा राज्य मार्गाशेजारी देवसरा गावाच्या हद्दीत गट क्रमांक ३२२/२ मधील १ हेक्टर ८३ आर जागा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत २००६ मध्ये भूमिहीन लाभार्थी सदाशिव उंदिरवाडे यांना समाज कल्याण विभागाच्या वतीने हस्तांतरित करण्यात आली. तत्पूर्वी जागेचे हस्तांतरण करताना भूमिअभिलेख विभागाच्या वतीने मोजमाप करण्यात आले होते. जागेचे हस्तांतरण झाल्यानंतर सदाशिव उंदिरवाडे यांनी धान पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली होती. नंतर एप्रिल २०१९ मध्ये वन विभागाच्या वतीने जागेचे मोजमाप करण्यात आले. सदाशिव उंदिरवाडे यांच्या हिश्श्यात असणारी ०.१५ जागा वन विभागाने ताब्यात घेतली आहे. ही जागा प्राप्त करण्यासाठी उंदिरवाडे यांनी संबंधित विभागात हेलपाटे घातले आहेत. वन, महसूल, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसमोर कैफियत मांडली आहे. प्रशासकीय विभागातील यंत्रणा न्याय देत नसल्याने उंदिरवाडे यांनी स्वतःच लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा १२ मार्च २०२० ला हस्तांतरित जागेचे मोजमाप भूमिअभिलेख कार्यालयाच्या वतीने मोजमाप करण्यात आले आहे. ०.१५ आर जागा वन विभागाने बळकावल्याचे निदर्शनास आले आहे. जागेची मोजणी करताना बपेरा वन विभागात कार्यरत कर्मचारी हजर होते. सदाशिव उंदिरवाडे यांच्या हिश्श्यात जागा असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर हस्तांतरण करण्यात आले नाही. तब्बल वर्षभरानंतर न्याय मिळाला नाही.
यासंदर्भात तुमसरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. वन व भूमिअभिलेख कार्यलयाच्या संयुक्त सर्वेअरअंतर्गत जमिनीचे मोजमाप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु जागेचे मोजमाप करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. यामुळे उंदिरवाडे यांचे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वन विभागाच्या विरोधात न्यायासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बॉक्स
समाजकल्याण विभागाचे कानावर हात
समाजकल्याण विभागांतर्गत सदाशिव उंदिरवाडे यांना जागेचे हस्तांतरण करताना विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनी पाहणी केली नाही. मालगुजारी तलावात असणारी १ हेक्टर ८३ आर बुडीत जागा हस्तांतरित करण्यात आली. खरीप हंगामात या जागेत उत्पादन घेता येत नाही. शासनाने उदरनिर्वाहाकरिता जागा दिली असली तरी उंदिरवाडे कुटुंबियांचे टेन्शन वाढविणारे ठरले आहे. तलावात असणाऱ्या या शेतीत ३ फूट पाणी राहत असल्याने माती काम करण्यासाठी त्यांनी समाजकल्याण विभागाला पत्र दिले होते; परंतु कुणी ऐकले नाही. यामुळे इच्छामृत्यूची मागणी करणार आहेत.
जल आंदोलनानंतरही न्याय नाही
सदाशिव उंदिरवाडे, हंसा बागडे, डोंगरे यांनी बुडीत जमिनीत उत्पादन घेता येत नसल्याने समाजकल्याण विभागाने फसवणूक केल्याच्या कारणावरून जल आंदोलन तलावात केले होते. यानंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तहसील कार्यालयात तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या शेतकऱ्यांच्या शेतीत मातीकाम करण्यात येणार असल्याचे कटिबद्ध करण्यात आले होते; परंतु आंदोलन समाप्त होताच या शेतकऱ्यांना ठेंगा दाखविण्यात आला होता. आश्वासनाचे गाजर दाखवून वेळ मारून नेण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत.