शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामात संपूर्ण धान हमीभाव केंद्रावर विकला. या धानाचे चुकारे मिळाले. मात्र, बाेनस पूर्ण मिळाला नाही. काही महिन्यांपूर्वी बाेनसची अर्धी रक्कम देण्यात आली. उर्वरित बाेनसबाबत कुणीही बाेलायला तयार नाही. अशातच रब्बी हंगामात विकलेल्या धानाचे चुकारेही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. गत आठवड्यात ४१८ काेटी रुपये धान चुकाऱ्यासाठी मंजूर झाल्याचा गाजावाजा करण्यात आला. साेमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा हाेतील, असे सांगण्यात आले, परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच आले नाही. शेतकरी अडचणीत असताना थकीत वीजबिलापाेटी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. या शेतकऱ्यांसाेबत शुक्रवारी आमदार डाॅ.परिणय फुके यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. निवेदन देऊन तत्काळ धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, माजी खासदार शिशुपाल पटले, राजेश बांते, मुन्ना फुंडे, संजय कुंभलकर, रुबी चढ्ढा, आशू गाेंडाणे, विनाेद बांते यांच्यासह शेकडाे शेतकरी उपस्थित हाेते.
बाॅक्स
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरू
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. जगाचा पाेशिंदा असलेल्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. मात्र, शासन शेतकऱ्यांना चुकारे देत नाही, उलट वीजपुरवठा खंडित केला जात आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार डाॅ.परिणय फुके यांनी दिला.