लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी २०२४ चे अवकाळी पावसाने धान पिकांचे कडपे नुकसानग्रस्त झाले. यानंतर खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यात पुरांचे पाणी धान पिकांत शिरले. दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या तलाठ्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांचे खात्यात आर्थिक मदत पोहोचली नाही. परिणामी पोळा सणांवर विरजण पडले आहे.
राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बचत खात्यात अनुदान घातले जात आहे. लाडक्या बहिणीला दीड हजाराची आर्थिक मदत दिली जात असली त्यांचे शेतकरी कुटुंब मात्र आर्थिक मदतीच्या अपेक्षेत आहेत. उन्हाळी २०२४ वर्षात शेतकऱ्यांची उन्हाळी धानाचे पीक घेतले आहे. धानाची कापणी केल्यानंतर शेतात धानाचे कडपे ठेवले. अवकाळी पावसाने धानाचे कडपे ओलेचिंब झाले होते. धानाचे कडप्यांना कोंब फुटले होते. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.
उन्हाळी धान पिकांचे नुकसान झाले असता तलाठ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. याद्या तयार करण्यात आल्यानंतर महसूल विभागात सादर करण्यात आले आहेत. परंतु उन्हाळी धान पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही.
वैनगंगा आणि बावनथडी नद्याचे काठावर अनेक गावे आहेत. पावसाळ्यात या नद्यांना दोनदा पूर आलेला आहे. पुरांचे पाणी ओसरल्यानंतर धान पिकांचे नुकसान झाले आहे. पूर शिरले नसल्याचे पंचनामे तलाठ्यांच्या पथकाने करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. परंतु या पंचनाम्यावर सरपंच यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. पुरांचे पाणी ओसरल्यानंतर महिनाभरात नुकसान दिसून येत आहे.
पुरांचे पाणी शिरलेल्या शेतात धान पिकांना अनेक रोगराईने ग्रासले आहे. यानंतर पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. पूर शिरलेल्या धान पिकांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे सरपंच यांनी दिले आहेत. या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. परंतु या महत्त्वपूर्ण प्रश्नावर कुणी बोंबलत नाहीत. पोळा सण दारात असताना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली नाही.
उन्हाळी आणि खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छदामही शेतकऱ्यांचे बचत खात्यात देण्यात आला नाही. शेतकरी संघटनाही आता मैदानात उतरण्यासाठी तयार झालेल्या आहेत. भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांनी आर्थिक मदतीच्या मागणीवरून पोळा फुटणार असल्याचे सांगितले आहे.
वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांचे नुकसान सिहोरा परिसरात नद्याचे काठावर गावे आणि शेती असल्याने पुरांचे पाणी शेतात शिरत आहे. धान पिकांचे नुकसान होत आहे. पुरांचे पाण्याची नोंद घेण्यासाठी यंत्रणा वेळेवर पोहोचत नाही. मुख्यालयात कुणी वास्तव्य करीत नाहीत. पूर ओसरल्यानंतर पुरांचे पाणी शिरले नसल्याचे शेरा देऊन मोकळे होत आहेत. हा वंचित करण्याचा डाव असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पुरांचे पाणी शिरत असल्याने सरसकट नोंद करण्याची मागणी होत आहे.