क्विंटलमागे हजार रूपयांचे नुकसान : अत्यल्प दराने खरेदीभंडारा : राज्य शासनाने तुर डाळीला ५,०५० रूपयांचा हमी दिला असला तरी खरेदी केंद्राअभावी भंडारा जिल्ह्यात ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. यात शेतकऱ्यांचे क्विंटलमागे १००० ते १२०० रूपयांचे नुकसान होत आहे.भंडारा जिल्ह्यात १.९१ लाख हेक्टर शेतजमिन लागवडीखाली असून धानाची सर्वाधिक लागवड करण्यात येते. शेतातील पाळीवर आणि काही ठिकाणी बांध्यात तूर पिकांची लागवड करण्यात आली. यावर्षी जिल्ह्यात सुमारे ११,००० हेक्टरवर तुर पिकाची लागवड करण्यात आली असून सरासरी शेतकऱ्यांना एकरी ५ ते ६ क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. यानुसार भंडारा जिल्ह्यात ६५ ते ६६ हजार क्विंटल सरासरी उत्पादन झाल्याची नोंद कृषी विभागात आहे. परंतु भंडारा जिल्ह्यात तुर डाळ खरेदीसाठी अधिकृत केंद्र नसल्यामुळे नागपूर बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. याचाच फायदा घेत शेतकरी ३,८०० ते ४,००० रूपये क्विंटल दराने तूर डाळ विकत आहेत. यात शेतकऱ्यांचे हजारांहून अधिक रूपयांचे नुकसान होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आठ कोटी रूपयांचे नुकसानभंडारा जिल्ह्यात यावर्षी ११ हजार हेक्टरमध्ये तूर पिकाची लागवड करण्यात आली. या लागवडीमधून तुरीचे सुमारे ६६ हजार क्विंटल सरासरी उत्पादन झाले. या उत्पादीत पिकाला ३,८०० रूपयांचा दर बाजारात मिळत आहे. यात हमी दरानुसार शेतकऱ्यांना हेक्टरी १,००० ते १,२०० रूपये याप्रमाणे नुकसान सहन करावे लागत आहे. याचाच अर्थ ६६ हजार क्विंटल तूर पिकांमागे १,२०० रूपये याप्रमाणे सुमारे आठ कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. हा पैसा शेतकऱ्यांच्या तोंडातून पळविला जात असताना एकाही लोकप्रतिनिधीने हा प्रश्न उचललेला नाही.राज्यात हमी भाव खरेदी केंद्र सुरू केल्याचे राज्य सरकार सांगत असेल तर भंडारा जिल्हा राज्यात नाही का? आमच्या जिल्ह्यात तूर, मुग, उडीद, तीळ या कठाण पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असूनही हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही. परिणामी व्यापाऱ्यांना कमी दराने तूर पीक विकावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे कि शेतकरीविरोधी हा प्रश्न संत्रस्त करीत आहे.- विलासराव श्रुंगारपवार, माजी राज्यमंत्री, भंडारा.
तूर डाळ खरेदीत शेतकऱ्यांची फरफट
By admin | Published: March 05, 2017 12:24 AM