लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत केंद्रावर धान विकल्यानंतरही दिवाळीपुर्वी चुकारे मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने सण साजरा करण्यासाठी जिल्हयातील अनेक शेतकरी धान व्यापाऱ्याला विकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेतकऱ्यांकडून १५०० ते १६५० रुपये प्रती क्विंटल धानाची खरेदी केली जात आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांचे दलाल गावागावांत सक्रीय झाले असून धान खरेदी करताना सातबारा आणि कोरा विड्रॉल घेतला जातो.भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या शेतकऱ्यांच्या घरी धान येत आहे. शासनाचे आधारभूत धान खरेदी केंद्रही सुरु झाले आहे. मात्र दिवाळीचा सण अगदी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची चणचण आहे. घरात असलेला धान आधारभूत केंद्रावर दिला तर १० ते १५ दिवस पैसे मिळण्याची शक्यता नाही. त्यातही टोकण व इतर बाबींची पुर्तता करावी लागते. दिवाळीला हातात पैसे नसेल तर सण साजरा कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या घरातील धान व्यापाऱ्यांना विकत असल्याचे दिसत आहे. व्यापारी धान खरेदी करताना आधारभूत किमतीपेक्षाही कमी किमतीतही धानाची खरेदी करीत आहे. १५०० ते १६५० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केली जाते .त्यातही धान मोजताना शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते. धान ओला असल्याचे कारण पुढे करीत ७० किलोच्या कट्ट्यावर दोन किलो अधिक धान घेतले जाते. तसेच वजन काट्यांवरही शेतकऱ्यांना संशय असतो. परंतु दिवाळी सणासाठी पैसे हवे असल्याने शेतकरी मुकाटपणे आपले धान विकुन मोकळे होत आहेत.ग्रामीण भागात सध्या व्यापाऱ्यांचे दलाल गरजवंत शेतकरी हेरुन त्यांच्याकडून धान खरेदी करीत आहेत. धान खरेदी करताना सातबारा. आधारकार्ड झेरॉक्स मागितली जाते. अनेकदा शेतकऱ्यांच्या कोऱ्या विड्रॉलवरही स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. एक प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. याकडे मात्र कुणाचेही लक्ष दिसत नाही.मजूरी. कापणी बांधणीचे नगदी पैसेल्ल एकीकडे निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी हवालदिल असताना जवळ पैसेही नाहीत. मात्र कापणी. बांधणी. मळणीसाठी नगदी पैसे द्यावे लागतात. कोणताही मजूर उधारीवर कामावर येत नाही. त्यामुळेही शेतकऱ्यांवर पैशाची चणचण असते. अनेक शेतकरी धानाच्या भरवशावर आपल्या वर्षभराचे गणित लावत असते. सण समारंभही साजरे करतात. परंतु निसर्गाच्या अवकृपेने धानाला उतारा निम्माच येत आहे.जिल्ह्यातील धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र आता शेतकऱ्यांनी दिवाळीपुर्वी कापणी केली. काही ठिकाणी मळणीही झाली आहे. अशा शेतात पंचनामा करणार कसा आणि शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची गरज आहे.- अविनाश ब्राम्हणकर.सदस्य भाजप प्रदेश कार्यकारिणी
दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांचा धान व्यापाऱ्यांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 10:00 PM
शेतकऱ्यांकडून १५०० ते १६५० रुपये प्रती क्विंटल धानाची खरेदी केली जात आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी व्यापाऱ्यांचे दलाल गावागावांत सक्रीय झाले असून धान खरेदी करताना सातबारा आणि कोरा विड्रॉल घेतला जातो. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे.
ठळक मुद्देदलाल सक्रीय : शेतकऱ्यांकडून घेतला जातो सातबारा आणि कोरा विड्रॉल