भारनियमनाचा विरोध : तीन दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा आंदोलनसाकोली : निवेदन देऊनही कृषीपंपाचे भारनियमन बंद न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज भर पावसातच वीज कार्यालयावर मोर्चा नेला. वीज कार्यालयाने दिलेले आश्वासन पाळले नाही तर तीन दिवसानंतर कुटुंबासह वीज कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करू, असा सज्जड इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.पावसाळा सुरु होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र पाण्याअभावी अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी बाकी आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांजवळ विहीर व बोअरवेलची सोय आहे. तरीही शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. कारण यावर्षी पहिल्यांदाच पावसाळ्यातही कृषीपंपाचे १६ तासींचे भारनियमन सुरु केले आहे. या भारनियमनाचा त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. जीवघेणे भारनियमन बंद करण्यात यावे, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील महिन्यात कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले होते. १ आॅगस्टपर्यंत भारनियमन बंद करण्यात आले नाही तर २ आॅगस्टला आंदोलन करू असा इशारा दिला होता. याची दखल न घेतल्याने काल शेतकऱ्यांनी वीज कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. दरम्यान आज मंगळवारी भर पावसात भारनियमनाचा विरोध करण्यासाठी शेकडो शेतकरी साकोलीत धडकले.शेतकऱ्यांचा मोर्चा लहरीबाबा मठ देवस्थान साकोली येथून निघाला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ‘भारनियमन बंद करा’ अशा घोषणा देत हा मोर्चा वीज कार्यालयावर पोहचला. यावेळी कार्यकारी अभियंता हे स्वत: शेतकऱ्यांजवळ आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत निवेदन स्वीकारले. सदर मागण्यांचे निवेदन हे मुंबईला पाठवू व तीन दिवसात यावर तोडगा काढू, असे आश्वासन दिले. यावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र तीन दिवसानंतर भारनियमन बंद न झाल्यास कुटुंबासह पुन्हा याच कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासूरकर, नरेंद्र वाडीभस्मे, हेमंत भारद्वाज, प्रमोद गजभिये, नरेश नगरीकर व तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेतकरी धडकले वीज कार्यालयावर
By admin | Published: August 03, 2016 12:24 AM