लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा कीड व रोगांमुळे, तसेच धान कापणीच्यावेळी लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच मोफतच्या शासकीय योजनांमुळे धान कापणी, बांधणी व मळणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. शिवाय दरात वाढ झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. धान बांधणीसाठी सध्या प्रति एकर धान बांधणीसाठी मजुरांना ३,००० ते ३,५०० रुपये मोजावे लागत आहेत.
जिल्ह्यात सद्यःस्थितीत धान कापणीसाठी महिला मजुरांना २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत, तर बांधणीसाठी पुरुषांकडून प्रतिदिन ४५० ते ५०० रुपये मजुरी घेतली जात आहेत. मागील काही वर्षांपासून धान बांधणीसाठी हुंडा पद्धती वाढली आहे. कापणीसाठी २५०० ते ३००० हजार रुपये प्रति एकरचा दर मजुरांकडून घेतला जात आहे. यावर्षी उत्पादन कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती आहे. शेती व्यवसाय आता अधिकच कठीण होऊन बसला आहे. अवाढव्य दरवाढ झाल्याने शेती करणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे.
खते आणि आणि कीटकनाशके महागली आहेत. परिणामी प्रति एकर लागवडीचा खर्चही वाढलेला आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, पाइप, मोटारपंप, विद्युत बिल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या मजुरांची आहे. शेतीच्या कामासाठी शोधूनही मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाल्यास त्याच्या मर्जीनुसार मजुरी द्यावी लागत आहे. आता यांत्रिकीकरणामुळे थोडेसे सोपे झाले असले, तरी विविध उपकरणांच्या वाढत्या किमती, त्यांना लागणाऱ्या इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत धान कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.
खर्चाच्या तुलनेत हमीभाव परवडेना यंदा धानाला हमीभाव अ ग्रेडसाठी २,३२० रुपये, तर ब ग्रेडसाठी २३०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला आहे. मागील पाच वर्षांत धानाचा हमीभाव फारसा वाढलेला नाही. तुलनेत इंधन, कीटकनाशके आणि शेती अवजारांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आधुनिक यंत्रामुळे पारंपरिक शेती व्यवसाय लोप पावला आहे. त्यातच दरवर्षी शेतकऱ्यांना बारदाणा खरेदी करताना विनाकारण जास्त पैसे मोजावे लागतात.
"सध्या खर्चाच्या तुलनेत शेतीचे उत्पन्न तोकडे आहे. कीड व रोगांमुळे यंदा धान उत्पादनात प्रचंड घट आली आहे. परंतु, बियाणे, वखरणी, खते, कीटकनाशके, मळणी आदींसह मजुरांचे दर सातत्याने वाढत आहेत. त्या तुलनेत धानाला कवडीमोल हमीभाव मिळत आहे. परिणामी शेती कसणे कठीण झाले आहे. हमी भावात वाढ होणे गरजेचे आहे." - विनोद पचघरे, शेतकरी, पांजरा (बोरी)