पिंडकेपार तलाठी कार्यालयाअंतर्गत पिंडकेपार, गीदलापार, पिटेझरी, खैरी, आलेबेदर, डोंगरगाव व पांगरी या आठ गावांचा समावेश आहे. शासनाच्या नवीन निर्णयाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी ई-पीक पद्धतीने स्वतः करावयाची आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली, तर काही शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या मार्फत नोंदणी केली. मात्र, त्यात त्रुटी असल्यामुळे तलाठी कार्यालयात सातबारे देण्यास उशीर होत आहे. सातबारा दुरुस्त करण्यात वेळ लागत आहे. मात्र, शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान्य देण्यासाठी नोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत करावयाची आहे. तेथे सातबारा आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. गुरुवारी पिंडकेपार तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करीत जिल्हा परिषद माजी सदस्य नंदू समरीत यांच्या नेतृत्वात तलाठी कार्यालयाला कुलूप लावले. तलाठ्यांना आतमध्ये कोंडले होते. काही वेळेनंतर चर्चा करून कुलूप उघडण्यात आले. यावेळी तलाठ्यांनी तांत्रिक अडचण सांगून शेतकऱ्यांचे समाधान केले. लवकर सातबारे देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
पिंडकेपार तलाठी कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:41 AM