चुल्हाड ( सिहोरा ) : सिहोरा-बपेरा परिसरातील चुल्हाड येथील रब्बी धान खरेदीकरिता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. येथील ५७८ शेतकऱ्यांनी आपले धान या खरेदी केंद्रावर दिला आहे. धान खरेदी केंद्र आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात उमेश कटरे त्यांच्या प्रयत्नाने चुल्हाड येथे सुरू करण्यात आला होता. यावर्षीची चुल्हाड-बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लागवड केली होती. रब्बी धानाच्या उत्पन्नही शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला मोठा धान हा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर १८६८ रुपये प्रति क्विंटल या दराने धान विकला असून, येथील शेतकऱ्यांचा २८ हजार क्विंटल धान या खरेदी केंद्रावर खरेदी केला असल्याची माहिती आहे. या शेतकऱ्यांचे जवळपास ५ कोटी ५० लाख रुपयांच्या चुकारे अडले आहेत.
जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही धानाचा चुकारे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक वेळा बँकेत जाऊन शेतकरी निराश होऊन, मागच्याच पावली घरी परत येत असल्यामुळे चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत आहे. रब्बी लागवडीकरिता लागणाऱ्या खर्चाकरिता शेतकऱ्यांनी आदीच उधारवाडी करून उत्पन्न घेतला आहे. मात्र, आता खरीप धानाच्या लागवडीकरिता लागणाऱ्या पैशासाठी शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. आपण रात्रंदिवस शेतात राबराब करून पीक घेतले असले तरी धान पिकाचे पैसे आपल्या खात्यात आतापर्यंत जमा झाले नाही.
याचा संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी शासना प्रति नाराजीचा सूर व्यक्त केला आहे. आज दीड महिन्याचा कालावधी होऊनही येथील शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे चुकारे अद्यापही जमा झाले नाही. त्यामुळे आता खरीप हंगामाच्या लागवडीकरिता शेतकऱ्यांनी पैसे आणावे कुठून अशा चिंतेत शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याचा महा विकास आघाडी शासनाने विचार करावा व लवकरात लवकर त्यांच्या खात्यात धानाचे चुकारे तत्काळ जमा करावे." अशी मागणी भाजप किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोरकर, भाजप युवा नेते किशोर रहांगडाले, कृउबा समितीचे उपसभापती डॉ. अशोक पटले, मयूरध्वज गौतम, सरपंच नेजनबाई गायधने, सरपंच ममता राऊत, शीतल चिंचखेडे, सरपंच वैशाली पटले, योगराज टेंभरे, खुमनलाल शरणागत तथा धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.