फोटो
तुमसर : धान पीक रोवणीकरिता सिंचनाची सोय असली तरी वीज वितरण कंपनीकडून थकीतबरोबर वीज बिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केल्याने, रोवणीयोग्य धान नर्सरी व धानपीक लागवडीकरिता शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, वीजपुरवठा खंडित करू नका, या मागणीला घेऊन तुमसरच्या वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांच्या मोर्चा काढण्यात आला.
मृग नक्षत्रात पावसाने जोरदार आगमन केले, त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीकरिता बियाणे बाजारातून विकत आणत शेतात पेरणी केली. आत सदर पेरणी केलेले धान बियाण्याची धान नर्सरी रोवणीयोग्य आली असली तरी पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून हुलकावणी दिली असल्याने शेतातील धान नर्सरी प्रखर उन्हाच्या तडाख्याने मरणासन्न अवस्थेत आली आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी धान पिकांची रोवणीसुद्धा केली आहे. सध्या धान रोवणीकरिता पाण्याची गरज असताना वीज वितरण कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याने ऐनदुष्काळाच्या तेराव्या महिन्यात सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात चिंतातुर झाला आहे.
तुमसर तालुक्यातील मरारसाखळी, झंजेरिया, पिपरा, आग्री आदी गावांतील संतप्त शेकडो शेतकरी तुमसर येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. दरम्यान, चक्क वीज वितरण उपविभागीय कार्यालय कुलूपबंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांविरोधात आपला संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली व गेल्या पंधरा दिवसांपासून मरारसाखळी व परिसरातील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला व येथील वीजखांबांवरील विद्युत रोहित्रसुद्धा गेल्या एक वर्षापासून बंद व नादुरुस्त अवस्थेत असल्याने येथील नियमित वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा वीज वितरण कार्यालयातील उपविभागीय अधिकारी रूपेश अवचट व लाइनमन यांच्या निष्काळजीपणामुळे व वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात संतापले आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याच्या नियोजनशून्यतेमुळे तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त मरारसाखळी परिसरातील शेतकऱ्यांना धान पीक लागवडीपासून व सिंचनापासून वंचित ठेवल्याचा डाव समोर आला आहे. त्यात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी पंपाचा वीजपुरवठा पूर्वरत सुरू करण्यात येत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनी कार्यालयातून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वीज वितरण कंपनी कार्यालयात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, येथील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता रूपेश अवचट यांना तुमसर तालुका छावा संग्राम परिषदेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल वराडे यांच्या नेतृत्वात सदर शेतकऱ्यांचा कृषी पंपांचा खंडित वीजपुरवठा पूर्वरत सुरू ठेवण्याचे व नादुरुस्त विद्युत रोहित्र दुरुस्त करणे व जास्त क्षमतेचा विद्युत रोहित्र सदर ठिकाणी नव्याने लावणे, अशा विविध मागण्यांसंदर्भात वीज वितरण कार्यालय शेतकऱ्यांनी गाठले. येत्या चार दिवसांत मागण्यांची पूर्तता झालीच नाही, तर आठ दिवसांनी परत हजारो शेतकऱ्यांचा उभारी मोर्चा तुमसर येथील वीज वितरण कार्यालयावर काढण्याचा इशारा ओबीसी छावा संग्राम परिषदेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल वराडे यांनी दिला. त्यावेळी प्रफुल्ल वराडे, साउजी शहारे, भारत रहांगडाले, सुभाष रहांगडाले, हरिओम पारधी, गेंदलाल रहांगडाले, राजकमल तुमसरे, गुणिलाल रहांगडाले, घनश्याम रहांगडाले, भाऊराव धुर्वे आदी शेतकरी उपस्थित होते.