पीक स्पर्धेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावावर जमीन असणे आवश्यक असून तो शेतकरी स्वतः जमीन कसत असला पाहिजे. तसेच लाभार्थ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली किमान दहा आर जमीन सलग लागवड असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण गटासाठी किमान दहा व आदिवासी गटासाठी किमान पाच स्पर्धक असावेत. पीक स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट असून अंतिम मुदतीपर्यंत विहित नमुन्यासोबत शेतकऱ्यांनी सातबारा, आठ अ चा उतारा, केवळ आदिवासी गटाकरिता जातप्रमाणपत्र बंधनकारक आहे. सर्वसाधारण तसेच आदिवासी गटाकरिता प्रवेश शुल्क ३०० रुपये तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावे. पुरस्काराची रक्कम तालुका पातळीवर प्रथम पुरस्कारास ५०००, द्वितीय ३००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी २००० रुपये असणार आहे. जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकासाठी १०,०००, तर द्वितीय क्रमांकासाठी सात हजार, तृतीय क्रमांकासाठी पाच हजार तर विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकासाठी २५००० तर द्वितीय क्रमांकासाठी २०००० तर तृतीय क्रमांकासाठी १५०००, राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५००००, द्वितीयसाठी ४०,०००, तृतीय क्रमांकासाठी ३०,००० रुपये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे. पीककापणीसाठी उत्पन्न निश्चित करण्याकरिता गावपातळीवरील नेमलेल्या समितीमार्फत ज्या स्पर्धक शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता तालुक्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा १.५० पट किंवा अधिक आहे. अशा शेतकऱ्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहेत. पीक स्पर्धेतील विहित नमुन्यातील अर्ज आपल्या गावच्या कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन लाखनीचे तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनाे खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:40 AM