शून्य व्याजाकरिता जुळवाजुळव : ८६.६० टक्के पीक कर्ज वसुलीपालांदूर : पालांदूर सेवा सहकारी संस्थेच्या शेतकरी सभासदांनी १ कोटी ३३ लाख ३७ हजार रूपये एवढी वसुली करीत नवीन पीक कर्जाकरिता पात्र ठरणार आहेत.पीक कर्जाशिवाय शेतकरी शेती करूच शकत नाही. दिवसेंदिवस शेती खर्चात वाढ होत आहे. शेतकरी हा जिल्हा बँक व सेवा सहकारी संस्थेचा गाभा आहे. ३१ मार्चपर्यंत पालांदूर जिल्हा बँकेच्या शाखेत ७६,०७८ पीककर्जाची वसुली झालेली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे हे सेवा सहकारी संस्थाना पीककर्ज वाटपाकरिता सहकार्य करीत आहेत. चालू सत्रात कोरडवाहूंकरिता एकरी १४ हजार रूपये तर ओलीताला १७ हजार रूपये पीककर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ५०० रूपये वाढविले आहे. पालांदूर सेवा सहकारी संस्थेच्या ४५४ कर्जदार शेतकऱ्यांपैकी ३६९ शेतकऱ्यांनी १ कोटी ३३ लाख ३७ हजार रूपये भरले आहे. शेतकऱ्यांच्या सेवेत आमची संस्था समर्पित असून नविन सत्रात पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे. पात्र सभासदांच्या कर्ज प्रकरणाला उचल देत शेती हंगामाला चालना देण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत सुरू असल्याचे पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे यांनी सांगितले. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी भरली पिककर्जाची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 12:33 AM