२३ लोक ०४ के
करडी (पालोरा) : यावर्षी पहिल्यांदा मृग नक्षत्र दमदारपणे बरसला. शेतकऱ्यांनो, निसर्गाच्या शुभसंकेताचा फायदा उचला. तातडीने बीज प्रक्रिया करून हिरवळीच्या खतावर गादी वाफ्यांची धान नर्सरी लावा. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी व निंबोळी अर्काचा तर रोपे वाढीसाठी युरीया ब्रिकेटचा वापर करा. रोपांची योग्य वाढ व दमदार पाऊस झाल्यानंतर अधिक उत्पादनासाठी ‘श्री’ व पट्टा पद्धतीने भात पिकाची लागवड करा व उन्नती साधा, असे आवाहन मोहाडी तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे.
मोहाडी तालुका कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी २०२१ मोहीम अंतर्गत दि. २१ जून ते १ जुलैपर्यंत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दि. २१ जून रोजी मुंढरी खुर्द येथे सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यानिमित्त प्रत्यक्ष शेतावर जाऊन धान नर्सरीची पाहणी करण्यात आली. तसेच कृषी सप्ताहाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मंडळ कृषी अधिकारी सी.एस. आकरे, सरपंच रेखा नेरकर, कृषी पर्यवेक्षक जे.पी. राऊत, माजी सरपंच रामभाऊ नेरकर, कृषी सखी सुनंदा बांते व गावातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी सी.एस. आकरे यांनी शेतीची योग्य मशागत करून ३ टक्के मिठाच्या द्रावणात धानाची बीज प्रक्रिया करावी आणि पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करण्याचे महत्त्व पटवून सांगितले. करडीचे कृषी पर्यवेक्षक जे.पी. राऊत यांनी १० टक्के रासायनिक खताची बचत करण्यासाठी सेंद्रिय खताचा, हिरवीच्या खताचा तसेच अझोलाचा शेतीत वापर करण्यास सांगितले. माती परीक्षण करून खताच्या मात्रा निश्चित करण्याचे पटवून सांगितले. सरपंच रेखा नेरकर यांनी शेती क्षेत्रात महिलांचा वाटा अनन्यसाधारण असून कृषीच्या प्रगतीसाठी महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कृषी सखी सुनंदा बांते यांनी महिला बचत गटातील सदस्यांना व शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
रासायनिक खतांमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाची हानी होत आहे. जमिनीचा पोत बिघडल्याने उत्पादन कमालीचे घटले आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर टाळावे. दशपर्णी व निंबोळी अर्काची फवारणी करून निसर्गाच्या जैविक साखळीचे संतुलन राखावे, शेतीच्या खर्चात बचत करून उत्पादन व उत्पन्न वाढवावे, जे विकेल तेच पिकवावे, असे कळकळीचे आवाहन माजी सरपंच रामभाऊ नेरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमासाठी करडीचे कृषी सहाय्यक यादोराव बारापात्रे, कान्हळगावचे कृषी सहाय्यक एस.पी. हट्टेकर, मुंढरी बुजचे कृषी सहाय्यक डी. एम. वाडीभस्मे व शेतकरी मित्रांनी, सखींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार कृषी सहाय्यक डी. एम. वाडीभस्मे यांनी मानले.
===Photopath===
230621\img-20210623-wa0055.jpg~230621\1528-img-20210623-wa0054.jpg
===Caption===
शेतकऱ्यांनो, हिरवळीचे खतावर गादी वाफ्यांची धान नर्सरी लावा~शेतकऱ्यांनो, हिरवळीचे खतावर गादी वाफ्यांची धान नर्सरी लावा