भंडारा : दरवर्षी जंगलाशेजारच्या शेतातील शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचा शेतकऱ्यांना अर्थिक फटका बसतो. आतापर्यंत शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांची 'पारध' करण्याचे अधिकार नव्हते.राज्य शासनाने अलीकडेच परिपत्रक जारी करून शेतमालाचे नुकसान करणाऱ्या रानडुक्कर व रोही यांची 'पारध' करण्याचे अधिकार शेतकऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार रानडुक्कर व रोही या वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे नुकसान होत असल्यास त्याची शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपालाकडे तक्रार करावी, अशा सूचना आहेत. त्यावर वनक्षेत्रपालाने शहानिशा करू न रानडुक्कर किंवा रोही यांची ‘पारध’ करण्याबाबत शेतकऱ्याला २४ तासात परवाना द्यावा. त्याचवेळी अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून पाच किलोमीटर सभोवतालच्या क्षेत्रात या अधिकाराचा वापर करताना अत्याधिक काळजी घेण्यात यावी, यासंबंधी प्रत्येक महिन्यात देण्यात आलेले परवाने व त्यानुसार पारध करण्यात आलेले रानडुक्कर व रोही यांच्या संख्येबाबत तपशिलाचा अहवाल वनक्षेत्रपालांनी संबंधित उपवनसंरक्षकाकडे पाठविण्यात यावे. त्यानंतर उपवनसंरक्षक व त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्तरावर पारध झालेल्या वन्यप्राण्यांबाबत दर महिन्याला आढावा घेऊन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे अहवाल सादर करावा, आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी वेळोवेळी शासनाला अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांची ‘पारध’ करण्याचे अधिकार !
By admin | Published: July 30, 2015 12:44 AM