कोंढा-कोसरा : नवीन कृषी धोरणांतर्गत कृषी ग्राहकांना थकबाकी बिल असेल तर त्यांच्या बिलात ५० टक्के वीजबिल माफ केले आहे. तसेच नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी आधीपेक्षा सरळ अशी नियमावली केली आहे, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अधीक्षक अभियंता राजेश नाईक, भंडारा यांनी वितरण कंपनी कार्यालय शाखा, कोसरा अंतर्गत कृषी धोरण २०२० जनजागृती शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.
निर्मलाताई रत्नपारखी कोसरा येथे कृषी नवीन धोरण २०२० बद्दल जनजागृती कार्यक्रम वितरण कंपनी कार्यालय, कोसरा यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपस्थित व्यासपीठावर कार्यकारी अभियंता विभाग भंडारा गायकवाड, उपकार्यकरी अभियंता पवनी विभाग भोयर, कनिष्ठ अभियंता पिल्लेवान, कनिष्ठ अभियंता वरखडे उपस्थित होते. या वेळी बोलताना पुढे अधीक्षक अभियंता नाईक म्हणाले, कृषीसाठी नवीन कनेक्शन देताना नवीन धोरणात मोठे बदल झाले आहेत. २० मीटर लांब पंप असल्यास कनेक्शन लवकरच मिळेल, ३० ते २०० मीटर पंप लांब असेल तर कनेक्शन ३ महिन्यांत देण्यात येईल. २००पेक्षा अधिक अंतर असेल तर एच.व्ही.डी.एस. सिस्टीमप्रमाणे कनेक्शन देण्यात येणार आहे, ६ पोलपेक्षा जास्त असेल तर सौरऊर्जा कृषीपंप देण्यात येणार आहेत. ५० टक्के थकबाकी योजनेचा लाभ घ्यावा, असे वाटणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत बिल भरण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतला कृषी पंप बिलवसुली केल्यास त्यांना प्रोत्साहन रक्कम असल्याचे सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन कनिष्ठ अभियंता पिल्लेवान यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वीज वितरण कंपनी कार्यालय कोसरा, कोंढा यांनी प्रयत्न केले.