साकोलीत प्रशिक्षण : नरेंद्र फिरके यांचे प्रतिपादन साकोली : आज ग्लोबलायझेशनचा काळ आहे. शेतकऱ्याचे उत्पादन वाढून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले जावे, याकरीता शेतकऱ्यांनी 'हायटेक' शेतीकडे वळावे म्हणून काटेकोर शेती विकास केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी प्रयत्न करीत आहे. आपण मिळालेल्या ज्ञानाचा स्वत:चे उत्पन्न वाढविणेकरीता उपयोग करावा. संघटीत होवून हायटेक शेती करावी आणि शेतीला उद्योगधंदा समजून शेतीकडे डोळसपणे बघावे, असे आवाहन प्रा. नरेंद्र फिरके, प्रमुख संशोधक, काटेकोर शेती विकास केंद्र, महात्म फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केले.कृषि विज्ञान केंद्र साकोली आणि काटेकोर शेती विकास केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दि.१ व २ सप्टेंबर हरितगृह तंत्रज्ञान विषयी प्रशिक्षण सुरू झाले आहे. या प्रशिक्षणास भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व गोंदिया जिल्ह्यातील ७० शेतकरी नोंदणी करून उपस्थित आहेत. अध्यक्षस्थानी डॉ.उषा डोंगरवार होत्या. त्यांनी बदलत्या हवामानात टिकून राणेकरीता तसेच भंडारा जिल्ह्यात भविष्यात हायटेक शेती यशस्वी करणेकरीता या प्रशिक्षणातून ज्ञान अवगत करून शेडनेट व पॉलीहाऊसमधील भाजीपाला उत्पादन मधील चुका दुरूस्त कराव्यात, हायटेक शेती करून स्वत:चे आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले.संचालन व आभार प्रदर्शन हेमंत जगताप यांनी केले. या प्रशिक्षणात हरितगृह अर्थशास्त्र, हरितगृहात फुलशेती व भाजीपाला लागवड, हरितगृहातील पिकांचे किड व रोग नियंत्रण, शेडनेटगृह तंत्रज्ञान, सुक्ष्म जलसिंचन, पिकांची काढणी व विक्री व्यवस्थापन आदी अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'पॉलिहाऊस' उभारावे
By admin | Published: September 03, 2015 12:23 AM