मोहाडी : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी भाताची नर्सरी २५ जूनपर्यंत गादी वाफ्यावर करावी, असे आवाहन कृषी विभाग मोहाडीतर्फे करण्यात आले आहे.
मोहाडी येथील शेतकरी राहुल हटवार, सखाराम मारबदे यांच्या शेतावर तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मंडळ कृषी अधिकारी चंद्रप्रकाश आकरे, पर्यवेक्षक ओमकार भट, सहायक जी. व्ही. रेहपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गादी वाफ्यावर पऱ्याची पेरणी करण्यात आली. दिवसेंदिवस महागाई वाढत असून, शेती खर्चात वाढ होत आहे. खर्चात बचत करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी घरातीलच बियाणे बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करावी. तसेच पेरणी ही गादी वाफ्यावर करावी. यामुळे पाऊस जास्त झाला तरी पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल व कोवळी रोपे सडण्याचे प्रमाण कमी राहील. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी १० टक्के रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी मातीपरीक्षण करून पर्यायी उपाययोजना म्हणून हिरवळीचे खत, अझोला कल्चर, युरिया ब्रिकेट, निंबोळी अर्क यांचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मोफत कृषिक अप डाऊनलोड हवामान अंदाज, कृषी व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ज्ञांचे लेख, कृषी गणकयंत्र व इतर कृषीविषयक उपयुक्त माहिती शेतकऱ्यांनी मिळवावी, असे आवाहन कृषी सहायक जी. व्ही. रेहपाडे यांनी केले आहे.
उत्पन्न खर्च कमी करण्यासाठी कृषी विभाग तत्परतेने शेतकऱ्यांच्या सेवेत मे महिन्यापासून रुजू आहे. कापणी ते बांधणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन शेतकऱ्यांना थेट शेतात जाऊन करीत आहेत. खताच्या मात्रेत दहा टक्के बचत करून जमिनीचा पोत सुधारण्याच्या दिशेने शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. यासाठी कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे.