सालेकसा : धडक सिंचन विहिरीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून योजनेचा निधी दिला नाही. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन विहिरीचे काम वेळेत पूर्ण केले. मात्र, निधी न मिळाल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रहारच्या नेतृत्वात सोमवारी (दि. ३०) भजेपार येथे विहिरीत बसून आंदाेलन केले.
धडक सिंचन विहीर योजना सन २०१९-२० अंतर्गत भजेपार येथील शेतकऱ्यांनी विहीर बांधकाम शासकीय नियमानुसार केली, पण आतापर्यंत निधी मिळाला नाही. शेतकऱ्यांच्या हितार्थ शासन दरबारी अनेक योजना राबविल्या जातात. त्यात धडक सिंचन विहीर योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली.
या योजनेसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति विहीर २.५० लाख रुपयांचा निधी दिला. तालुक्यातील धडक सिंचन विहिरीचा लाभ मिळालेल्या एकूण ५८ शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून विहिरीचा निधी देण्यात आला नाही.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून स्वतःच्या पदरचे पैसे खर्च केले. सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले. पैसे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त होऊन विहिरींचा निधी कधी मिळणार या विषयाला घेऊन अधिकाऱ्यांकडे, तसेच जनप्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून काही उपयोग झाला नाही.
भजेपार येथील शेतकऱ्यांनी छगन बहेकार यांच्या शेतातील विहिरीत बसून शासनाविरोधात आंदोलन केले. प्रल्हाद बहेकार, छगन बहेकार, टायकराम ब्राह्मणकर, भागवत बहेकार, रमेश चुटे, जागेश्वर भांडारकर, रघुनाथ चुटे, पुरुषोत्तम बहेकार या शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
आंदोलनाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे पदाधिकारी सुनील गिरडकर, अभय कुराहे, मिथिलेश दमाहे, अजय मच्छिरके, चंदू बडवाईक, सुभाष उईके, देवा टेकाम, बंटी बावनथळे यांनी केले. आंदोलनस्थळी सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अरविंद राऊत यांनी शेतकऱ्यांची समजूत घातली. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचे लिखित संबंधाने आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
भजेपार येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. धडक सिंचन विहीर योजनेचे दोन वर्षांपासून पैसे न मिळाल्याने शेतकरी आंदोलनासाठी खाटेला दोर बांधून विहिरीत उतरले होते. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विहिरीतून बाहेर येत पेंडाल लावून आंदोलन सुरू ठेवले आहे.
- अरविंद राऊत,
ठाणेदार सालेकसा.
धडक सिंचन विहीर योजनेअंतर्गत आम्ही शेतकऱ्यांनी काटकसर करून तर काहींनी कर्ज काढून विहीर बांधली. मात्र, मागील दोन वर्षांपासून अजून पैसे मिळालेले नाही. आमचे पैसे कधी देणार या संबंधाने लिखित आश्वासन जोपर्यंत संबंधित विभाग आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही.
-प्रल्हाद बहेकार, शेतकरी भजेपार.