तथागत मेश्राम
वरठी (भंडारा) : जिद्दीला प्रयत्नांची साथ मिळाली की यश सोपं होतं हे सिद्ध करून दाखविले आहे नेरी येथील जयंत कारेमोरे यांनी. शिक्षणासाठी शेत व घर विकावे लागले तरी चालेल पण प्रयत्न सोडायचे नाहीत, असा वडिलांनी धीर दिला. आईने शिक्षणासाठी गटातून पैसे उभे केले. एवढेच नाही तर स्पर्धा परीक्षा शिकवणीकरिता मोठ्या बहिणीने लाख रूपये दिले. तरीही पैसे अपुरे पडत असल्याने जयंतने घरीच अभ्यास केला. यूपीएससी परीक्षेत थोडक्यात हुकलेली संधी त्याने राज्य आयोगाच्या परीक्षेत मिळवली.
नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य आयोगाच्या परीक्षेत त्याने राज्यातून २४ वी रँक मिळवत ओबीसी प्रवर्गातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. स्वप्नांच्या मागे धावताना मिळालेली संधी सोडायची नाही, असा संदेश त्यांनी युवकांना दिला. शेतकरी कुटुंबातील नेरीसारख्या लहानशा गावातून दैदिप्यमान यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मोहाडी तालुक्यातील वरठीनजीकच्या नेरी येथील प्रल्हाद कारेमोरे या शेतकऱ्याचा जयंत हा मुलगा आहे. त्याला १ भाऊ ४ बहिणी असून, त्यांच्या वडिलांनी मुलांना शिक्षणाची समान संधी दिली. चारही मुली उच्चशिक्षित असून, जयंतने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी घरीच केली. ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या वाचनालयातून पुस्तके आणून त्याने ही तयारी केली. दरम्यान, यूपीएससी परीक्षेत यश काही गुणांनी निसटले. पण त्याने धीर सोडला नाही.
राज्य आयोगाच्या जागा निघताच त्याने अर्ज भरला व परीक्षा दिली. राज्य आयोगाच्या असिस्टंट मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर पदाकरिता राज्यातील दीड लाख युवकांनी प्रीलिम परीक्षा दिली. त्यातून फक्त पाच हजार युवकांची निवड मुख्य परीक्षेकरिता निवड झाली. आमदार राजू कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य व सरपंच आनंद मलेवार, उपसरपंच रामदास जगनाडे, विक्रम मेश्राम, गंगाधर वैद्य, देवचंद वैद्य यांच्यासह गावकऱ्यांनी जयंतचे जंगी स्वागत केले.
सरपंच ठरले देवदूत
जयंत जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवायचा. यामुळे ऐन परीक्षेच्या काळात त्याची तब्येत बिघडायची. अशा कठीण प्रसंगी सरपंच आनंद मलेवार नेहमी मदतीला धावून जात व आर्थिक मदतीसह त्याच्या उपचारासाठी मदत करायचे, अशी माहिती जयंतच्या वडिलांनी दिली. जयंतची जिद्द पाहून ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची सुरूवात केल्याने त्याला फार मदत झाली.