लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नैसर्गिक प्रकोप आणि कोरोना संकटाने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून खरीप हंगामात विकलेल्या धानाचा बोनसही मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक गणित बिघडल्याने यंदा शेतकरी घरचेच बियाणे वापरण्याच्या तयारीत आहेत. हंगाम सुरू होऊनही कृषी केंद्रांमध्ये शुकशुकाट दिसत आहे.भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा २ लाख १३ हजार ८३७ हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे. त्यासाठी ५१ हजार ३२० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. महाबीज आणि खासगी कंपन्यांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु अर्धा मृग नक्षत्र संपला तरी अद्यापही कृषी केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी दिसत नाही. यावर्षी कोरोना संकटाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. खरीप हंगामात विकलेल्या धानाचे हमीभावानुसार मिळालेले पैसे गरजेसाठी वापरण्यात आले. बोनस मिळेल आणि त्यातून बियाण्यांची खरेदी करू असे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते. परंतु अद्यापपर्यंतही बोनसचे पैसे मिळाले नाही. कधी मिळणार याबाबतही अनिश्चितता आहे. शेतीची मशागत झाली. हातात पैसा नाही. अशा स्थितीत संकरीत बियाणे विकत घेऊन पेरण्यापेक्षा घरचेच बियाणे पेरण्याची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. अनेक शेतकरी घरचे बियाणे पेरण्याच्या तयारीत असल्याने कृषी विभागही त्यांच्या मदतीला धावून आला आहे. बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमतेचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन केले जात आहे. बियाण्यांबाबत परावलंबित्व टाळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नाहीत ते एकमेकांकडून घेऊन पेरणीच्या तयारीत आहेत. पेरणीसाठी एकरी सहा किलो बियाण्यांची गरज असते. सध्या शेतात साफसफाईची कामे सुरू असून नर्सरी टाकण्याची पूर्व तयारी सुरू आहे. दमदार पाऊस पडल्यानंतर कोरडवाहू शेती असणारे शेतकरी पऱ्हे टाकण्याला सुरुवात करतील. तर ओलिताची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकणीला सुरुवात केली आहे. दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकु नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले असुन सर्वांच्या नजरा दमदार पावसाकडे आहेत.
संकरीत बियाण्यांच्या किमतीत वाढ n धानाच्या संकरीत वाणाच्या विविध प्रजाती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक कंपन्यांनी गावागावांत मोर्चेबांधणीही केली आहे. यंदा बियाण्यांच्या किमतीत जवळपास २० टक्केने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. साधारणत: संकरीत बियाण्यांची एक किलोची बॅग ३५० रुपयाला बाजारात उपलब्ध आहे. परंतु आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांकडेच पाठ फिरविली आहे. सध्या कृषी केंद्रांमध्ये शेतकरी केवळ चौकशी करण्यासाठी येत आहेत. परंतु कुणीही बियाणे खरेदी करताना दिसत नाहीत. यंदा शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.
घरच्या बियाण्यांचे उत्पन्न १५ ते १८ क्विंटल- गत काही वर्षांपासून अर्ली व्हेरायटीच्या नावाखाली शेतकरी संकरीत वाणाची पेरणी करीत आहे. जिल्ह्यात एकरी २५ ते ३० क्विंटल संकरीत वाणाच्या बियाण्यांचे उत्पन्न होते. मात्र त्यासाठी मोठा खर्चही करावा लागतो. दुसरीकडे साधे किंवा घरचे बियाणे वापरले तर १५ ते १८ क्विंटल उत्पन्न येत असल्याचे जाणकार शेतकरी सांगतात.