तुमचा तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांना धान्याच्या लागवड खर्च निघावा व त्यांच्या हातात दोन पैसे मिळावे, याकरिता शासनाने धानाला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस घोषित केले होते. परंतु २०१९ पासून अकरा महिन्यांचा कालावधी लोटला तरीसुद्धा अजूनपर्यंत धाणाचा बोनस मिळाला नाही. चालू हंगामात बोनस मिळणार किंवा नाही, अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तुमसर तालुक्यात अस्मानी संकट मागील तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे. धानाचे पीक शेतकऱ्यांना परवडणारे नाही. लागवडीच्या खर्चसुद्धा निघत नाही.
शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न, शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये धान विक्री केली. त्यानंतर शासनाकडून त्यांना बोनस मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही शेतकऱ्यांना धानाचे बोनस मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. यासंदर्भात अनेकदा शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले; परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी पत्राद्वारे केली आहे.