पालांदूर : परतीचा पाऊस लांबण्याच्या शक्यतेने धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. चुलबंद खोऱ्यात हंगाम अंतिम टप्प्यात आला असून पाऊस लांबल्यास हलक्या धानाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधी पावसाअभावी आणि आता पावसामुळे धान पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.
जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या हंगामावर उठलेला आहे. हप्ताभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची हजेरी सुरू आहे. धान पिकाचा हंगाम जोमात असला तरी नियमित पाऊस चिंतेचा झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली तर निश्चितच अपेक्षित हंगाम हाती लागणार आहे. चुलबंद खोऱ्यातील शेतात हलका धान आठवडाभरात काढणीला येणार आहे. मात्र निसर्गाची टांगती तलवार शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे. जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्येसुद्धा पाऊस कोसळत आहे. जलसाठे पूर्णत्वाकडे जात असून काही ठिकाणी ओव्हर फ्लोचे चित्र अनुभवायला येत आहे. कापणी योग्य धान पावसाच्या दणक्यात मातीमोल होत आहे. लोंबी जड होत असल्याने संकट उभे आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही हंगाम हातचा जाण्याची शक्यता आहे.
हलका ते मध्यम कालावधीचे धान कापणी योग्य झालेले आहेत. नियमित पाऊस व ढगाळ हवामानाने भारी धानसुद्धा लवकरच फुलोऱ्यावर येत आहेत. अशा संकटसमयी शेतकरी चिंतातुर असून करावे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परतीचा मान्सून राजस्थानमधून माघार घेतो. गत पाच वर्षांचा अभ्यास घेतला असता १५ सप्टेंबरनंतरच मान्सूनने माघार घेतलेली आहे. राजस्थानातून माघारीची तारीख १ सप्टेंबर यापूर्वी ठरविण्यात आली होती. परंतु हवामानातील बदलामुळे परतीचा पाऊस लांबत असल्याचे दिसत आहे.
धान पिकावर रोगराईचे संकट!
नियमित ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर रोगराईचे संकट आहे. करपा, कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी, रसशोषक कीडी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. पावसामुळे फवारणीचे नियोजन फसत आहे. फवारणी न केल्यास अपेक्षित धान पीक हाती येण्याची शक्यता अत्यल्प आहे. लोंबी न भरणे, मानमोडी, हळद्या रोग, तुडतुडा यासारख्या रोगांची लागण दिसत आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने रोगराईचे प्रमाण वाढत आहे. परतीचा पाऊस अधिकच लांबल्यास हंगाम ओल्या दुष्काळाच्या छायेत जाण्याची दाट शक्यता आहे.
कोट
धान परिपक्व होऊन कापणी योग्य आहे. नियमित पाऊस व वाऱ्याने धान झोपलेला आहे. हंगाम हाती घेऊन डोळ्यांच्या समोर मातीमोल होत असल्याने हृदयाचे ठोके वाढलेले आहेत.
गजानन शिवणकर
शेतकरी ढिवरखेडा