लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील भिलेवाडा ते खडकी मार्गावरील खमारी बुट्टी नाल्यावरील पूल दरवर्षी पाण्याखाली असतो. यंदाही पुरामुळे १९ ते २२ जुलैपर्यंत हा मार्ग बंद होता. नवा पूल बांधकामाची मागणी सातत्याने होत असताना गोसे खुर्द पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत. लोकप्रतिनिधीही लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य रजनीश बन्सोड व ग्रामवासीयांनी खमारी येथे १६ ऑगस्टपासून पूल बांधकामासंबंधीच्या ठोस निर्णयासाठी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.
भिलेवाडा ते खडकी हा जिल्हा मार्ग असून, अत्यंत वर्दळ आहे. या मार्गावर तिरोडा ते भंडारा, भंडारा ते करडी पालोरा बससेवा नित्याने सुरू असते. मोहाडी तालुक्यातील करडी-पालोरा परिसरातील नागरिक याच मार्गाने भंडारा मुख्यालयाशी जोडले जातात; परंतु खमारी गावाजवळील पूल सिमेंट पायल्यांचा असल्याने दरवर्षी तीन ते चारदा पुराखाली बुडालेला असतो. शेतशिवारही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होते. विद्यार्थी व नागरिकांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटतो. शाळकरी मुलांना शाळेत पोहोचता येत नाही. उद्योग व व्यापार ठप्प पडतो.
पावसाळ्यात नाल्यावरून पाच ते दहा फूट पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील संपूर्ण व्यवस्था कोलमडते. खमारी गावाला पुराचा विळखा बसतो. पुलाची उंची कमी असल्याने नवीन पुलाचे बांधकाम होणे आवश्यक आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व गोसे खुर्द पाटबंधारे विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत. त्यामुळे दोन्ही विभागांनी उपोषणस्थळी येऊन पुलाचे बांधकाम कोण करणार, यासंबंधीचे ठोस आश्वासन द्यावे; परंतु अंदाजपत्रक तयार होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार, असा निर्धार रजनिश बन्सोड व ग्रामवासीयांनी व्यक्त केला आहे.
दोन पूल बांधले, तिसरा का नाही?गोसेखुर्द पाटबंधारे विभागाच्या वतीने भिलेवाडा ते खमारीदरम्यान तीन पुलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. यापैकी करचखेडा व सुरेवाडा येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात आले; परंतु खमारी येथील पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. आता ते खमारी येथील पूल बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगत आहेत, तर बांधकाम विभाग गोसेखुर्द पाटबंधारे विभागाकडे बोट दाखवीत आहे. त्यामुळे तिसऱ्या पुलाचे बांधकाम रखडले असल्याची माहिती बन्सोड यांनी दिली आहे. तिसऱ्या पुलाचे बांधकाम का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.