आज मतमोजणी : तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक तुमसर : तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदाकरिता रविवारी मतदान पार पडले. ७१ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. तुमसर व मोहाडी तालुक्यात ११ मतदान केंद्र होते. येथे एकूण मतदारांची संख्या ३,७६२ होती. ९६ टक्के मतदान झाले. तुमसरात शकुंतला सभागृहात सोमवारला सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरु होणार आहे. तुमसर- मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तब्बल सात वर्षानंतर घेण्यात आली. दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र तथा राज्यात तांदळाची मोठी ही बाजारपेठ आहे. कोट्यवधीची येथे उलाढाल आहे. प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी येथे मोर्चेबांधणी केली होती. आज, रविवार रोजी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी होती. मतदारांत प्रचंड उत्साह होता. तुमसर तालुक्यात तुमसर शहर, नाकाडोंगरी, लेंडेझरी, बिनाखी, सिहोरा, मिटेवानी तर मोहाडी तालुक्यात मोहाडी, हरदोली/झं., करडी, कांद्री, आंधळगाव येथे मतदान केंद्र होते. १९ संचालक पदाकरिता सेवा सहकारी गटज्ञतून ११, मापारी/हमाल १, ग्रामपंचायत ४, पणन/प्रक्रिया १, अडत्या/व्यापारी २ संचालकांचा समावेश आहे. या निवडणूकीत तीन आघाड्या तयार केल्या होत्या. या आघाड्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राकां पक्षातील नेत्यांचा समावेश होता. निवडणूक निकालानंतर येथे चित्र स्पष्ट होईल. तिनही आघाड्यात काट्याची टक्कर वर्तविण्यात येत आहे. मागील दीड महिन्यापासून उमेदवार व त्यांचे समर्थकांनी प्रचाराकरिता परिश्रम घेतले. विजयाची खात्री येथे सर्वानीच वर्तविली. पंरतू प्रत्यक्ष निकालानंतर ते कळेल. सभापती पदाकरिता येथे जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
७१ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद
By admin | Published: August 22, 2016 12:28 AM