लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी ग्रामीण भागात लोकशाहीचा उत्सव पार पडला. यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व तीन नगरपंचायतींच्या निवडणुका अंतर्गत सरासरी ६८.५९ टक्के मतदान झाले. यात तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्था मिळून एकूण ८३० उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. आता १८ जानेवारी उर्वरित जागांवरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच १९ जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भंडारा जिल्हा परिषदेच्या एकूण ५२ गटांपैकी ३९ गटांसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी २४५ उमेदवार रिंगणात उभे होते. यापैकी १३६ पुरुष, तर १०९ महिलांचा समावेश आहे. सातही पंचायत समितीच्या ७९ जागांसाठी ४१७ उमेदवार उभे आहेत. त्यात २२८ पुरुष, तर एक १८९ महिला उमेदवारांचा समावेश होता. याशिवाय तीन नगरपंचायत अंतर्गत ३९ जागांसाठी १६८ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळपासूनच मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, बोचऱ्या थंडीमुळे सकाळी ९.३० वाजतापर्यंत मतदानची टक्केवारी कमी होती. उन्ह वाढल्यानंतर मतदारांमध्येही उत्साह संचारला. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंतच्या मतदानाने टक्केवारीत वाढ झाली. पुरुष व महिला या मतदारांनी हिरीरिने लाेकशाहीच्या या उत्सवात भाग घेतला. उल्लेखनीय म्हणजे सायंकाळी ५.३० नंतरही काही मतदान केंद्रात नागरिक मतदानासाठी रांगेत उभे होते. काही ठिकाणी रात्री ७.३० वाजतानंतरही मतदान सुरू असल्याची माहिती मिळाली. एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली.
नगरपंचायतीत सरासरी ७२ टक्के मतदान- जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी व लाखांदूर नगरपंचायत निवडणुकीत सरासरी ७२.४६ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात मोहाडी येथे ७४.२०, लाखांदूर ७८.१९ तर लाखनी येथे ६५ टक्केच्यावर मतदान झाल्याची माहिती आहे. तिन्ही नगरपंचायत अंतर्गत ३९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.
सखी मतदार केंद्राची मदतग्रामीण पातळीवर लोकशाहीचा उत्सवाअंतर्गत पार पडलेल्या मतदान प्रक्रीयेत महिलांसाठी सखी मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. यात केंद्रावर आलेल्या सखींना म्हणजेच महिला मतदारांना येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यादीत नाव तसेच कोरोना नियमासंदर्भात माहिती दिली. येणाऱ्या प्रत्येक महिलांना सॅनिटायझर देवूनच आत प्रवेश देण्यात आला.
थंडीचा परिणाम मतदानावरपारा उतरल्याने विदर्भात थंडीची लाट पसरली आहे. याचा परिणाम मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जाणवला. सकाळपाळीत मतदान फार अत्यल्प झाले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानांतर्गत सकाळी ९.३० वाजतापर्यंत फक्त ४.०६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हळुहळू मतदानाची टक्केवारी वाढत गेली.
दिव्यांगांनी बजावले कर्तव्यतापमान किमान अंशावर आले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिव्यांगांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच दिव्यांग तसेच वृद्ध व्यक्ती आधाराच्या सहायाने मतदान केंद्रांपर्यंत आले. तसेच त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान करीत इतरांनाही मतदान करण्याची प्रेरणा दिली. काही दिव्यांग मतदार व्हिलचेअरवर तर कुणाला चक्क कडेवर घेवून मतदान केंद्रात प्रवेश करताना दिसून आले.
पोलिसांचा चोख बंदोबस्तजिल्हा परिषद, पंचायत समिती व तसेच मोहाडी, लाखनी व लाखांदूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने १४५५ पोलीस कर्मचाऱ्यांची तैणाती केली होती. उल्लेखनीय म्हणजे १८ जानेवारीला खुल्या जाग्यांसाठी निवडणूक होणार आहे. तेव्हापर्यंत मंगळवारी झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम मशीनही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
सॅनिटायझर व थर्मल स्कॅनिंग- कोरोनाच्या सावटानंतर प्रथमच सार्वत्रिक निवडणूक झाली. परिणामी केंद्रावर आलेल्या मतदारांची थर्मल स्कॅनिंग व प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते.
आता लक्ष १८ जानेवारीकडेजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्थगित झालेली निवडणूक १८ जानेवारीला होणार आहेत. आज मंगळवारी ३९ गट व ७९ गणांसाठी निवडणुका पार पडल्या. उर्वरीत १३ गट व २५ गणांसाठी १८ जानेवारीला मतदान झाल्यानंतरच १९ रोजी मतगणना होणार आहे.