संजय साठवणे
साकाेली (भंडारा) : वर्षभरापूर्वी लग्न झाले. सुखाने संसार सुरु हाेता. घरात नव्या पाहुण्याची चाहूल लागली. सर्व घर आनंदात हाेते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य हाेते. वडिलांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मुलाचा जन्म झाला. मृत्यूच्या दु:खसागरात आनंदाचा टाहाे फाेडला. साकाेली येथील नांदगावे परिवारासाेबत नियतीने असा क्रूर खेळ रचला.
चेतन नांदगावे या २६ वर्षीय तरुणाचे तीन दिवसांपूर्वी आजारात निधन झाले. चेतन मूळचा लाखनी तालुक्यातील काेल्हारीचा वडील शिक्षक असल्याने संपूर्ण शिक्षण साकाेलीत झाले. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतरही चेतन आपल्या बहिणीकडे साकाेलीत राहत हाेता. बहिणीच्या व्यवसायाला हातभार लावत हाेता. वर्षभरापूर्वी म्हणजे ५ मार्च राेजी २०२१ राेजी चेतनचा विवाह नागपूर जिल्ह्यातील पल्लवीसाेबत पार पडला. सुखाचा संसार सुरू हाेता. अशातच घरात नवीन पाहुणा येण्याची चाहूल लागली.
सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, चेतनच्या पाेटात वेदना सुरू झाल्या. त्याला उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान १६ एप्रिलला चेतनने अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डाेंगर पसरला. गर्भवती असलेली पत्नी पल्लवी शून्य नजरेने पतीच्या पार्थिवाकडे पाहत हाेती. शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. मंगळवारी पल्लवीला प्रसवकळा सुरू झाल्या. एका गाेंडस मुलाला जन्म दिला. मात्र, दुर्दैव असे की, चेतनला आपल्या मुलाचा चेहरा बघता आला नाही. मुलाला कधी वडिलाचा प्रत्यक्ष चेहरा पाहता येणार नाही. मृत्यूच्या दु:खसागरात आनंदाचा टाहाे फाेडला असला, तरी कुटुंब मात्र चेतनच्या मृत्यूने सावरले नाही. आई-वडीलांसह पत्नीच्या डोळ्यातील अश्रू अविरत वाहत आहेत.
चेतनच्या अकाली मृत्यूने हळहळ
आई-वडिलांचा एकुलता एक चेतन नांदगावे याचा मृत्यूने साकाेली आणि लाखनी तालुक्यात हळहळ व्यक्त हाेत आहे. सेवानिवृत्त वृद्ध वडील, दाेन बहिणी, पत्नी आणि आता जन्माला आलेला नवागत असा भरला संसार साेडून अर्ध्यावर चेतन निघून गेला. चेतनच्या जाण्याचे डाेंगराएवढे दु:ख कुटुंबावर आहे, तर दुसरीकडे चेतनला मुलगा झाला याचाही आनंद आहे.