साकोली : तालुक्यातील सासरा, कटंगधरा व न्याहारवाणी या गावांमध्ये सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या हातभट्टीच्या व देशी दारुमुळे कौटुंबिक महिलांना होत अललेल्या त्रासाला कंटाळून महिलांनी दारुविरुद्ध एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला. पण प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे महिलांनी या तिन्ही गावात रॅली काढण्याच्या व पोलीस चौकी सानगडीवर जाऊन निवेदन देण्याचा निर्णय घेतला .
रॅलीत शिवकुमार गणवीर, दिलीप उंदिरवाडे, सहचिव राजू बडोले, किशोर बारस्कर, सुनंदा रामटेके, वनिता नंदेश्वर, देवांगना सयाम, मीनाक्षी बोंबार्डे, दारुबंदी महिला समिती सासराच्या अध्यक्ष देवांगना नेवारे, उपाध्यक्ष, सिमधु गोटेफोडे, ज्योती बोरकर, उषाताई संग्रामे, सुनंदा चांदेवार, चित्ररेखा रुखमोडे, प्रियंका कापगते, गीता रुखमोडे, रेखा खंडाते आदींचा समावेश होता. सासरा येथून दारुबंदीचे बॅनर्स सजवलेल्या ट्रॅक्टरसमोर ठेवून महिलांची पायदळ रॅली काढली. ही रॅली सासरावरुन कटंगधरा येथे नेण्यात आली, न्याहारवाणी होत रॅली परत सासराला येऊन सासरा येथील विठ्ठल रुखमाईच्या मंदिराच्या पटांगणात मोठी सभा घेण्यात आली.
पोलीस विभागाने परवानगी न दिल्यामुळे रॅली सानगडी पोलीस चौकीवर नेता आली नाही. या सभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिवकुमार गणवीर यांनी मार्गदर्शन केले. सासरा येथे येऊन साकोली पोलीस अधिकारी कुमरे यांनी निवेदन स्वीकारले. अवैध धंदे विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे आवश्यक सर्व कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले .
अशा आहेत मागण्या
सासरा, कटंगघरा, न्याहारवाणी येथील हातभट्टीची अवैध दारू व पिण्याच्या लायसन्सवर विकली जाणारी देशी दारू विकण्याचा धंदा समूळ बंद करण्याची कारवाई करण्यात यावी, गावात दारूच्या पेट्या पुरवणाऱ्या परवानाप्राप्त देशी दारूच्या घाऊक व किरकोळ दुकानदारविरुद्ध कारवाई करावी, प्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावे, दारुड्याकडून महिला खासकरून विद्यार्थी यांना त्रास होत असल्यास तात्काळ कारवाई करण्यात यावी, दारूबंदी जुगार सट्टा बंदीकार्य करणाऱ्या महिला समितीच्या कार्यकर्त्यांशी दारू विक्रेते व दारुडे भांडण करतात, दुर्व्यवहार करतात, त्यावेळी पोलीस विभागाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी, पिण्याच्या परवान्यावर दारू विकण्याचा धंदा करणाऱ्याविरुध्द कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे.