लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर विभागांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना झालेला त्रास हा त्यांनी केलेला प्रवास व अन्य कारणांमुळे होऊ शकतो, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली.रविवारी दुपारी २.३० वाजता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, उपजिल्हा आरोग्य अधिकारी निखील डोकरीमारे उपस्थित होते.पांचाळ म्हणाले की, नागपूर विभागातील आदिवासी विकास विभागाच्या आठ प्रकल्पातील जवळपास २७०० मुले व ४०० शिक्षकांचा स्टाफ भंडारा येथे डेरेदाखल झाला. या प्रकल्पातून आलेल्या विद्यार्थ्यांनी पहाटे चार वाजतापासून प्रवास सुरु केला होता. दुपारचे जेवण विद्यार्थी व शिक्षकांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे केले. नंतर मैदानावर सराव सुद्धा केला. सराव व उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, डोकेदुखी व अन्य त्रास उद्भवल्यामुळे प्रकल्प कार्यालयातील आरोग्य समितीतील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. एकुण १९३ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून १९ विद्यार्थी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी १५ विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. १२ पैकी दोन विद्यार्थ्यांना अतिसाराची लागण तर सात विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्रवास आणि झोपेच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना पित्त आणि त्रास झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पांचाळ यांनी स्पष्ट केले. जिल्हा क्रीडा संकुलातून अन्न व पाण्याचे नमुने एफडीए आणि आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच नेमके काय घडले होते कळेल, असेही पांचाळ यांनी सांगितले.डॉ.प्रमोद खंडाते म्हणाले की, रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी २० डॉक्टरांची चमू जिल्हा क्रीडा संकुलात उपस्थित आहे. यापैकी काल घडलेल्या प्रकारामुळे डॉक्टरांची प्रत्येकी चमूने प्रकल्प निहाय विद्यार्थ्यांची तपासणी केली.आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कुठलीही हयगय आम्ही सहन करणार नाही. अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाली असेल व यात जो कोणी दोषी असेल त्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे.- गीता सिडाम, सभापती, महिला व बालकल्याण समिती, न.प. भंडारा
‘त्या’ विद्यार्थ्यांना प्रवासाचा थकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:23 PM
नागपूर विभागांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना झालेला त्रास हा त्यांनी केलेला प्रवास व अन्य कारणांमुळे होऊ शकतो, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली.
ठळक मुद्देपत्रपरिषद : प्रकरण सावरण्यासाठी प्रशासनाची धावपळ