लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना आता धान विकताना पुन्हा त्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाच्या हजेरीने शेतकरी धास्तावला आहे. आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.जिल्ह्यात गुरूवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही भागात पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह लाखनी, कोंढा, पालांदूर, लोहारा व जांब, कांंद्री, लाखांदूर, पवनी तालुक्यातील चौरास भाग, मोहदुरा यासह खरबी नाका परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात दोन दिवसापासून असलेल्या या ढगाळ वातावरणाने शेतकरी धास्तावले आहेत. खमारी येथे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या जिल्ह्यातील ७९ केंद्रावर आधारभूत धान खरेदी केली जात आहे. आतापर्यंत ७० ते ८० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला धान आधारभूत केंद्रावर आणून तो बाहेर उघड्यावर ठेवला आहे. आता पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ताडपत्र्या झाकून धान वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे काही शेतांमध्ये उच्च प्रतीच्या धानाची कापणी आणि मळणी सुरू आहे. या ढगाळ वातावरणामुळे कडपा ओला होत आहे. मजुराअभावी धान काढणे कठीण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कडपा झाकून ठेवला आहे.यावर्षी शेतकऱ्यांना महापुरासह कीडींच्या प्रादूर्भावाचा सामना करावा लागला. संकटाशी दोन हात करीत शेतकऱ्यांच्या घरी धान आला. त्यातही उतारा निम्म्यावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. आता धान विकायला काढला तर पुन्हा पावसाने हजेरी लावली. गत काही वर्षांपासून शेतकरी नैसर्गीक संकटांचा सामना करीत असल्याचे दिसत आहे.
धान खरेदी केंद्रावर मनुष्यबळाचा अभाव जिल्ह्यात आधारभूत धान खरेदीचे ७९ केंद्र सुरू झाले आहेत. परंतु याठिकाणी मनुष्यबळाचा अभाव असल्याने धान मोजणीस विलंब होत आहे. केंद्रावर धानाची पोती उचलण्यासाठी हमाल अतिरिक्त दर घेत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे धान खरेदी केंद्रावर मोजणीपर्यंतची जबाबदारी शेतकऱ्यांची आणि मोजणी झाल्यानंतरची जवाबदारी खरेदी केंद्र चालकांची असते. शेतकऱ्यांचा धान आणला त्यादिवशीच विकला गेला तर शेतकऱ्यांना नैसर्गीक आपत्तीला तोंड द्यावे लागणार नाही. परंतु शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागते आणि सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना येथे दिसत नाही.