लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : घरफोडी असो, खून असो की अमली पदार्थांची तस्करी. गुन्हेगारांचा माग घेण्यासाठी श्वानपथक मदतीला धावून येते. भंडारा जिल्हा पोलीस दलातही सहा श्वान असून आतापर्यंत अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात या श्वानांची मदत झाली आहे. भंडारा पोलीस दलाची शान असलेले हे श्वान आरोपींचा माग घेण्यात अत्यंत तरबेज आहेत.जिल्हा पोलीस दलात नाॅटी, राॅकी, ब्रुनो, किंग, बोल्ड, तेजा हे सहा श्वान पथक आहेत. गुन्हे, शोध पथकातील नाॅटी हा श्वान डाॅबरमॅन जातीचा असून अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात मदत झाली आहे. भंडारा शहरातील खांबतलाव परिसरात एका तरुणाचा खून झाला होता. नाॅटी त्या ठिकाणी कर्तव्यावर गेली. काही क्षणातच आरोपीला ओळखून त्याच्या अंगावर उडी घेतली. यासोबतच चप्राड येथील गर्भवती सुनेच्या खून प्रकरणातील आरोपीचा शोधही नाॅटीने लावला. राॅकी हा लॅब्राडाॅर जातीचा श्वान असून तो पुणे सीआयडी येथून प्रशिक्षण घेऊन भंडारा जिल्हा पोलीस दलात सहभागी झाला आहे. अमली पदार्थ शोध पथकातील ब्रुनो या श्वानाने आतापर्यंत १५ कारवाईत सहभाग घेतला. बाँब शोधनाशक पथकातील किंग, बोल्ड आणि तेजा हे श्वान भंडारा जिल्ह्यातच नाही तर नागपूर रेंजमध्ये कर्तव्यावर जातात. कोणत्याही मोठ्या नेत्यांची सभा असली की या तिघांच्या मदतीनेच संपूर्ण परिसराची तपासणी केली जाते. यासोबतच रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी परिसराची तपासणी त्यांच्याकडून केली जाते.
४० घटनांचा लावला छडा
- भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकाने वर्षभरात सुमारे ४० घटनांचा तपास लावला आहे. मांगली येथे घरफोडी झाली होती. नाॅटी श्वान तेथे पोहोचले. काही क्षणातच आरोपीच्या घरापर्यंतचा माग काढला. ब्रुनो या अमली पदार्थ शोध पथकातील श्वानाने आतापर्यंत १५ कारवाईत सहभाग नोंदविला. कुठेही घटना घडली की श्वान पथक काही वेळात हजर होते.
योग्य देखभाल आणि नियमित सराव
- सहा श्वानांची योग्य देखभाल आणि नियमित सराव त्यांचे हँडलर करतात. श्वान पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सतीश सिरीया यांच्या मार्गदर्शनात हँडलर टिकाराम कोरे, प्रल्हाद ढोरे, सतीशकुमार गिऱ्हेपुंजे, आशिष बडवाईक, राजेश बांते, योगराज तवाडे, योगेश मोहरकर, नितेंद्र टिचकुले, अतुल मेश्राम, प्रकाश नागरीकर त्यांची देखभाल करतात. पोलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पथक कार्यरत आहे.
सीआयडी मासिकाने घेतली ‘नाॅटी’ची दखल
नाॅटी हा श्वान भंडारा जिल्हा पोलीस पथकाचा श्वास आहे. आरोपींना ओळखण्यात अत्यंत तरबेज असलेल्या या श्वानाची दखल सीआयडी मासिकानेही घेतली आहे.पोलीस दलातील सहा श्वानांसाठी निवासाची स्वतंत्र व्यवस्था आहे. त्याठिकाणी सर्व सुविधा असून सकाळ-संध्याकाळ सरावासोबतच त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. विभागीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याचा पुरस्कारही मिळाला.