‘साद माणुसकीची समूह लाखनी’चा उपक्रम
लाखनी : पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने आपल्याबरोबरच इतर सजीव घटकांचा विचार न करता केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल कोलमडत चालला आहे. भविष्यात पर्यावरणीय समस्यांना प्रत्येकाला सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन ‘साद माणुसकीची समूह लाखनी’ या समूहातील महिला शिक्षकांनी वटपौर्णिमेनिमित्ताने २४ रोजी तालुक्यातील पेंढरी येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेमागील पटांगणावर वटवृक्षारोपण केले.
अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सुनीता मरस्कोल्हे होत्या. यावेळी संध्या गिऱ्हेपुंजे, प्रमोदकुमार फुले, सरपंच राजेंद्र कुंभरे, सेवक टिचकुले, दीपावली भोयर, सूर्यभान सिंगनजुडे गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उषा कठाने, मीनाक्षी सिंगनजुडे, शालू उरकुडे, मंगला बोपचे, ऊमा टिचकुले, अंजना पिंपळशेंडे, निराशा टिचकुले आदी महिला शिक्षकांनी तसेच प्रमोद हटेवार,चंद्रशेखर गिऱ्हेपुंजे, रवींद्र म्हस्के, ज्ञानेश्वर लांडगे, विलास आंबेडारे, चेतन भुळे, सूर्यभान टिचकुले, किशोर कठाने, संतोष सिंगनजुडे, देवदास काटगाये, सुरेश येळे, विवेक बोरकर, पुरुषोत्तम झोडे यांनीही वृक्षारोपण केले.
कोरोनामुळे घरचा कर्ता पुरुष गमावलेल्या पोहराच्या आशा प्रमोद मेश्राम यांना उदरनिर्वाह करण्यासाठी अतिथींच्या हस्ते समूहाकडून पिको-फाॅल मशीन भेट देण्यात आली.
कोट
‘साद माणुसकीची समूह लाखनी’ हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समूह समाजोपयोगी विविध कार्य करत असतो. समाजातील निराधार, दिव्यांग, अनाथ, विधवा, वृद्ध, कोरोना रुग्ण अशांना वेळोवेळी वस्तूरूपात मदत करत असतो. यावेळी वटवृक्षांचे रोपण करून त्यांचे पुढील पाच वर्ष संवर्धन करण्याची जबाबदारी समूहाने घेतली आहे.
पुरुषोत्तम झोडे, समूह प्रमुख