पती गंभीररित्या जखमी : सिंदपुरी फाट्यावरील घटनालोकमत न्यूज नेटवर्कपवनी : दुचाकीने पत्नीला घेऊन कोंढा येथे जाणाऱ्या एका इसमाच्या वाहनाला विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पती गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना बुधवारला सायंकाळी ५.३० वाजता भंडारा-पवनी राज्य मार्गावरील सिंदपुरी फाट्यावर घडली.कामाक्षीअम्मा रामसागर (५०) रा.कोंढा (कोसरा) असे मृत महिलेचे नाव आहे. रामालू रामसागर हे दुचाकी क्रमांक एमएच२७ /एजी ४१३३ ने पत्नीसह कुर्झा-गोसेबुज मार्गाने कोंढा येथे जात होते. दरम्यान सिंदपुरी फाट्यावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या धानाची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एमएच ३१ /सीक्यु ८७७४ ने रामसागर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रामालू हे रस्त्याच्या बाजूला तर कामाक्षीअम्मा रामसागर या ट्रकच्या मागील चाकात दबल्या गेल्या. ट्रकचे चाक पोटावरून गेल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांचे पती रामालू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पवनी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेतला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला. पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरु आहे. सायंकाळपर्यंत वाहनचालक पोलिसांच्या हातात लागलेला नव्हता.रेतीची जड वाहतूक सुरूचपवनी शहरातील मुख्य चौकातून दररोज जड वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. विशेष म्हणजे रेती तस्करांच्या प्राबल्यामुळे जड वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. पवनी तालुक्यातील रेती घाटांमधून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असून ही रेती नागपुरला नेली जात आहे. या जड वाहनांच्या भरधाव वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे याचा फटका रस्त्यांनाही बसत आहे. रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. तरीही याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष गेलेले नाही.कुर्झा - गोसे हा मार्ग अरुंद असून सखल आहे. परिणामी विरुद्ध दिशेने येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. या वळणावर तसेच फाट्यावरही ही स्थिती असल्याने दिवसेंगणिक अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भरधाव ट्रकने महिलेला चिरडले
By admin | Published: June 01, 2017 12:25 AM