१० आरोपींना अटक : भंडारातील मेंढा परिसरातील घटना, पाठलाग करून हल्लेखोरांना पकडलेभंडारा : पे्रमविवाहाला विरोध असतानाही मुलीने लग्न केल्यामुळे मुलीच्या संतप्त कुटुंबीयांकडील १० ते १२ जण मुलाच्या घरी येऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मेंढा परिसरात घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी वधूपक्षाकडील १० जणांना अटक करून गुन्हे दाखल केले.माहितीनुसार, मेंढा नेहरू नगरातील रहिवाशी येशुदास चौबे (२५) यांनी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सावरी येथील वैष्णवी तांडेकर (१९) हिच्याशी २८ सप्टेंबर रोजी भंडारा येथे प्रेमविवाह केला. येशुदासची आई सुनिता चौबे या नगरपालिकेत रोजंदारी मजुरी करतात. नेहरू नगरातीलच एका भाड्याचे घरात ते पहिल्या माळ्यावर आई व पत्नीसह राहतात. दरम्यान, आज शनिवारला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास सुनीता चौबे या कामावर जाण्याच्या तयारीत असताना वैष्णवीचे नातेवाईक असलेले दोन तरूण त्यांच्या घरी आले. परिचित असल्यामुळे येशुदासने वैष्णवीला चहा-नाश्ता बनविण्यासाठी सांगितले. परंतु काही वेळातच त्यातील एक तरूण कुणाला तरी फोन करण्यासाठी बाहेर गेला. त्यानंतर चारचाकी वाहनाने वैष्णवीचे वडील शंकरलाल तांडेकर पाच-सहा लोकांसोबत आले आणि अश्विनी (वैष्णवीचे घरचे नाव) कुठे आहे, असे म्हणत स्वयंपाक खोलीत शिरले. आणि वैष्णवीचे केस पकडून तिला बाहेर ओढत आणले. येशुदासने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी येशुदासला मारहाण करीत गळा दाबला. त्यानंतर चार लोकांनी येशुदासला पकडून पहिल्या माळ्यावरून खाली फेकले. यादरम्यान, हल्लेखोरांनी येशुदासच्या आईलाही मारहाण केली. यात हे तिघेही गंभीररित्या जखमी झाले. येशुदासच्या घरी जोरजोराने सुरू असलेला आवाज एैकून वॉर्डातील लोक धावून आले. थोड्या वेळातच लोकांची गर्दी जमली. जमावाला बघून हल्लेखोर चारचाकी वाहनाने पळाले. त्यापूर्वीच वॉर्डातील लोकांनी त्यांचा पाठलाग केला. याची माहिती पोलिसांना तातडीने कळविण्यात आली, पोलिसांनीही पाठलाग केला असता शहराजवळील टाकळी परिसरात हल्लेखोरांना वाहनासह पकडण्यात आले. तोपर्यंत मेंढा परिसरातील शेकडो लोकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी येशुदासच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी वैष्णवीचे वडील शंकरलाल तांडेकर (४९), अर्जुन तांडेकर (४२), प्रल्हाद तांडेकर (५५), कपिल हनवत (२६) चंचल भैरम (२३) पवन तांडेकर (२३) लखन आनंद (२५) अशोक शरणागत (२५), राहुल हनवत (२१), दिलीप पटले (२७) या १० जणांविरूद्ध भादंवि ४५२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४ व ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. यावेळी आरोपींनी कटंगीहून आणलेले जीप क्रमांक एम.पी.५०/ सी.२७३९ व दुचाकी क्रमांक एम.पी.५०/ एम.एच. ७३१३ ही वाहने पोलिसांनी जप्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)येशुदासला मिळाली होती धमकीवैष्णवीचे वडील शंकरलाल तांडेकर हे बालाघाट जिल्ह्यातील कटेधरा कटंगी क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचा जुते-चप्पलचे व्यवसाय असल्यामुळे ते विविध गावात जुते-चप्पलांचा सेल लावतात. येशुदास हा त्यांच्याकडे काम करायचा. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी त्याची वैष्णवीशी ओळख झाली. पहिले मैत्री त्यानंतर प्रेम आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. विवाहानंतर वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून २९ सप्टेंबरला येशुदासला धमकी देणारा फोन आला होता. त्यानंतर येशुदासने याची भंडारा पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर रोजी तक्रार केली. आज सरळ जीवघेणा हल्ला केला. ते आम्हाला जीवानिशी मारायलाच आले होते, असे येशुदास ‘लोकमत’शी बोलताना सांगत होता.
प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला
By admin | Published: October 09, 2016 1:15 AM