तुमसर येथील घटना : तीन आरोपींना अटक, क्षुल्लक कारणावरुन चाकूने वारतुमसर : दुचाकीत त्वरित पेट्रोल भरुन दे, असे म्हणत तीन तरुणांनी पेट्रोलपंप कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची केली. त्यानंतर वाद वाढला. अशातच त्या तरुणांनी त्या कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता शहरातील रिझवी पेट्रोलपंपावर घडली. सचिन गोपाल गुप्ता (३२) रा. तुमसर असे जखमीचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण देशभ्रतार (२५), राहुल कनोजे (२५), हेमंत रगडे (३६) रा.तुमसर हे शनिवारी रात्री दुचाकीने पेट्रोल भरण्याकरिता रिझवी पेट्रोलपंपावर गेले. दुचाकीत त्वरित पेट्रोल भरुन दे, असे म्हणत त्यांनी सचिन गुप्ता याला दिले. सचिन गुप्ता याने पाणी पिऊन येतो, त्यानंतर पेट्रोल भरुन देतो असे सांगितले. त्यावरुन त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. आरोपींनी सचिनवर चाकूने हल्ला केला. सचिन याच्या मानेवार, गालावर व पोटावर वार केले. यात सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर आरोपी दुचाकीने फरार झाले. त्यानंतर त्याने आरडाओरड केली असता जवळचे दुकानदार मदतीसाठी धावून आले. त्यांनी सचिनला रुग्णालयात हलविले. याची माहिती कौलास गुप्ता यांनी तुमसर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान पळून गेलेल्या तरुणांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे त्यांनी दुचाकी नगरपरिषदेजवळ ठेऊन पळत होते. दरम्यान विरुध्द दिशेने येणाऱ्या पोलिसांच्या पथकाला हे तरुण संशयास्पद स्थितीत दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी भादंवि ३०७, ३४, ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक तिवारी करीत आहेत. या घटनेनंतर शहरात पेट्रोलपंप रात्री १०.३० वा. बंद करण्यात येतात. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील सर्व पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)
पेट्रोलपंपावरील तरुणावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: May 25, 2015 12:44 AM