भंडारा : येथील तकीया वॉर्डात स्थित सिटीकेअर हॉस्पीटलमध्ये चप्पल ठेवणारी लोखंडी रॅक अंगावर कोसळून आर्यन गौरीशंकर अवचटे (९) या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी हॉस्पीटल प्रशासन मंडळातील आठ डॉकटरांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये डॉ. मनोज चव्हाण, डॉ.स्मिता चव्हाण, डॉ.रोहित वाघमारे, डॉ.पल्लवी वाघमारे, डॉ. दीपक नवखरे, डॉ. प्रिती नवखरे, डॉ. यशवंत लांजेवार, डॉ. आशा लांजेवार यांचा समावेश आहे. माहितीनुसार, १० जून २०१९ रोजी गौरीशंकर अवचटे हे त्यांची पत्नी तसेच मुलगा आर्यन व मुलगी अवंती यांच्यासह भंडारा येथील सिटीकेअर हॉस्पीटलमध्ये प्रतिभा विठ्ठलराव नखाते यांना पाहण्यासाठी आले होते. त्यांना बघून झाल्यावर सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास परत जात असताना आर्यन हा चप्पल काढण्यासाठी लोखंडी रॅकजवळ गेला. यावेळी त्याचे वडील पार्किंगमधून कार बाहेर काढण्यासाठी गेले होते. चप्पल काढीत असताना आर्यनच्या अंगावर लोखंडी रॅक कोसळली. यावेळी आर्यनच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच अवचटे यांच्या साळूभाऊ यांची मुलगी त्रिजा हिलाही किरकोळ मार लागला.
याच दवाखान्यात आर्यनवर प्रथमोपचार करुन नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पहाटे २ वाजताच्या सुमारास आर्यनचा मृत्यू झाला. हॉस्पीटल प्रशासनाने सदर लोखंडी रॅक हॉस्पीटलच्या आवारात कुठल्याही नटबोल्टने फीट न करता आधाराविना ठेवली होती. याच निष्काळजीपणामुळे लोखंडी रॅक आर्यनच्या अंगावर कोसळून आॅर्यनचा मृत्यू झाला, अशी तक्रार गौरीशंकर अवचटे यांनी भंडारा पोलिसात दिली होती. तपासाअंती भंडारा पोलिसांनी सिटीकेअर हॉस्पीटलमधील बोर्ड आॅफ डॉयरेक्टर पदावर असलेल्या उपरोक्त आठही डॉक्टरांवर भादंविच्या ३०४ (अ) ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक आतराम करित आहेत