गोंदिया : जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत असलेल्या शाळांमधील उच्चश्रेणी मुख्याध्यापक तसेच विज्ञान विषय शिक्षकांची अनेक पदे रिक्त असून त्यांना त्वरित भरण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
चर्चेत, शाळांमधील उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याने शिक्षक पदोन्नतीपासून वंचित असून मुख्याध्यापकांची कामे सहायक शिक्षकांना करावी लागत आहेत. तसेच विज्ञान विषय शिक्षकांची पदे रिक्त असल्याने उच्च श्रेणी मुख्याध्यापक व विज्ञान विषय शिक्षकांची पदे भरण्याची मागणी समितीच्या शिष्टमंडळाने केली. यावर हिवारे यांनी मुख्याध्यापकांची पदे रोस्टर तयार करून भरण्यात येतील व विज्ञान विषय शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा प्रस्ताव सामान्य प्रशासनाकडे पाठविण्यात आला असून, लवकरच रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले. याशिवाय शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांचीही रिक्त पदे भरण्यात यावी, कोविड-१९ व इतर कारणांनी मागील वर्षभरात २० शिक्षकांचा अकस्मात मृत्यू झाला व त्यांचे सर्व देय प्रकरण निकालात काढून सुरक्षा कवच निधीचा लाभ मिळवून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची हमी हिवारे यांनी दिली. मे महिन्याचे वेतन २० तारखेपूर्वी झाले असून जून महिन्याचे वेतन बिल अविलंब बोलावून १ तारखेला वेतन मिळण्याची मागणी करण्यात आली. यासाठी जिल्हास्तरावरून आरटीजीएसच्या माध्यमातून वेतनाची व्यवस्था करावी, असेही मत व्यक्त करण्यात आले. तेव्हा निश्चितच आरटीजीएसची व्यवस्था करणार असल्याचे हिवारे यांनी सांगितले. चर्चेला आनंद पुंजे, डी.टी. कावळे, कृष्णा कापसे, डी.एस. ढबाले, एम.ओ. रहांगडाले, एन.बी. सुलाखे उपस्थित होते. आभार जिल्हा सरचिटणीस एस. यु. वंजारी यांनी मानले.
विषय शिक्षकांना वेतनवाढ लागू करा
निवडश्रेणी व चटोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रस्ताव अविलंब मंजूर करून सेवापुस्तिका पंचायत समित्यांना परत करा, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यात यावा, सन २००९ नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना कायम आदेश देण्यात यावे, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्त प्रस्ताव ६ महिन्यांआधीच जिल्हा परिषदेला मंजुरीसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. विषय शिक्षकांना वेतनवाढ लागू करण्यात यावी, यासह इतरही मागण्यांवर चर्चा करण्यात आली.