भंडारा : जिल्ह्यातील असलेल्या खाजगी शंभर टक्के अनुदानित शाळांमधील गणित, इंग्रजी व विज्ञान विषयात असलेली शिक्षकांची व कनिष्ठ लिपिकांची रिक्त पदे त्वरित भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिक्षण संस्था संचालक मंडळ जिल्हा भंडाराच्यावतीने करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन पुणे येथील शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था संचालित शाळांमध्ये गत अनेक वर्षांपासून सेवानिवृत्तीमुळे शिक्षकांची तसेच कनिष्ठ लिपिक यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहे, पण गणित, इंग्रजी व विज्ञान या महत्त्वाच्या विषयाची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच या विषयाचे शिक्षक जिल्ह्यात अतिरिक्त नाहीत. त्यामुळे खाजगी शाळा चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. खाजगी शाळांना शिक्षक वेतन अनुदान अत्यल्प प्रमाणात मिळत असल्यामुळे खाजगी संस्था हलाखीच्या परिस्थितीत आहे. त्यामुळे संस्था आपल्या स्तरावरून महत्त्वाचे असलेल्या विषय शिक्षकांची मानधनावर नियुक्ती करू शकत नाही. शिक्षकेतर अनुदान सातव्या वेतन आयोगाच्या टक्केवारीनुसार देण्यात यावे अशी मागणीसुद्धा आहे. महाराष्ट्र शासनाने शिक्षकांची पदे भरण्याकरिता पवित्र पोर्टल प्रणाली आणली पण आजपर्यंत जिल्ह्यात खाजगी संस्थेद्वारा संचालित शाळेत एकही शिक्षक भरती करण्यात आलेला नाही. त्यामुळे खाजगी शाळेत जुन्या प्रचलित पद्धतीने पदे भरण्याची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येऊ शकेल. भंडारा जिल्हा शैक्षणिक संचालक मंडळातर्फे निवेदनातून सदर शिक्षकांची व रिक्त असलेल्या कनिष्ठ लिपिक यांची पदे भरण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे.निवेदनात मंडळाचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, सचिव हेमंत बांडेबुचे, सदस्य सचिन तोडकर अमोल हलमारे यांच्यासह अन्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहे.