लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना योद्धा सफाई कामगार व सहायक यांना सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे, या मागणीसाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.रिपब्लिकन पँथर संघटनेनुसार कोरोना योद्धा सफाई कामगार व सहायक यांना सेवेत पूर्ववत रुजू करून घेण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पँथर संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ मार्च पासून बेमुदत ढोल बजाओ आंदोलन सुरू होते. या आंदोलनात एकूण १६ कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील २५ पेक्षा जास्त संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पँथर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे, जिल्हा महासचिव आदेश कानतोडे, तालुकाध्यक्ष अखिलेश वैद्य, संयुक्त लोकशाही आघाडीचे जेष्ठ नेते अचल मेश्राम, सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष तुलशीराम गेडाम, बुद्धिष्ट युथ फॉर्सचे जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव हिवराज उके, लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवदास गजभिये, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी, मैत्री महिला संघटनेच्या हेमाताई गजभिये, एकलव्य सेनेचे दिपक मारबदे, इंटक कास्ट्राईब संघटनेचे डॉ. विनोद भोयर, संयुक्त लोकशाही आघाडीचे नाशिक चवरे, संजीव भांबेरे, राहुल वानखेडे, शशिकांत देशपांडे, दिगंबर रामटेके, शिवसेना महिला आघाडीच्या सविता तुरकर, शालिनी नागदेवे आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी झाले होते. सदर आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आंदोलनात सहभागी सर्व १६ कोरोना योद्ध्याना सेवेत पूर्ववत रुजू करून घेतल्यानंतर २३ मार्चला सदर आंदोलन मागे घेण्यात आले.
ढोल वाजवून वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कोरोना योद्धा सफाई कामगार व सहाय्यक यांना सेवेत पुर्ववत रुजु करुन घेण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ मार्चपासुन बेमुदत ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला १६ दिवस पुर्ण झाल्यानंतरही या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाने पाठ दाखविली. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांना अचल मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ढोल वाजवत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधुन घेतले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची माफी मागुन लक्ष वेधण्यासाठी ढोल वाजविल्याचे सांगितले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी घडवुन आणत जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवुन आंदोलनकर्त्यांना सेवेत रुजु करण्याचे आदेश दिले.