मारहाण प्रकरण : तुमसर तालुक्यातील टेमणी येथील घटना भंडारा / तुमसर : एका शेतात मित्रासंह आंबे तोडण्याकरिता गेलेल्या मुलाला शेतमालकाने शिवीगाळ केली. त्यामुळे भितीने पळून जाणाऱ्या मुलापैकी एका दहा वर्षीय मुलाला पकडून जबर मारहाण करण्यात आली. यात बालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील टेमणी येथे घडली. चंकीत शिवदास राऊत (१०) असे मृतक बालकाचे नाव आहे. तर चैनलाल चंदूलाल पटले असे आरोपीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारला टेमनी शेतशिवारात घडली. चंकीत राऊत हा त्याच्या समवयस्क मित्रांसोबत चैनलाल पटले यांच्या शेतातील आंबे तोडून खाण्याकरिता गेले होते. आंबे तोडीत असताना शेतमालक पटले हे शेतात पोहचले. त्यांना सदर मुले आंबे तोडताना दिसल्याने शिवीगाळ केली. शेतमालक पकडून मारेल या भितीने आंबे तोडणाऱ्या मुलांनी शेतातून पळ काढला. दरम्यान पटले यांनी या मुलांचा लगतच असलेल्या नहरापर्यंत पाठलाग केला.शेतमालक पाठलाग करीत असल्याचे पाहून मुलांनी चांदपूर ते चुल्हाड नहराच्या पाण्याच्या उडी घेतली. यानंतर नहराच्या पाण्यातून पोहत वाट काढून दुसऱ्या तिरावर पोहचले. मात्र चंकितला पोहता येत नसल्याने तो नहरातील गवताला पकडून दबा धरुन बसला होता. त्यामुळे तो शेतमालकाला दिसल्याने त्याने चंकितला तिथे काठीने बेदम मारहाण केली. जिवांचा आतांकाने ओरडून चंकितने पटले यांना विनवणी केली. मात्र त्याने न सोडता आणखी मारहाण केली. मारहाणी दरम्यान चंकितचा गवतावरुन हात सुटल्याने व मारहाणीत तो अशक्त होवून पाण्यात पडला. यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.याप्रकरणानंतर भयभीत झालेल्या मुलांनी ही हकीकत घरी जावून कथन केली. याप्रकरणी मात्र तक्रार देण्यास कुणीही पुढाकार घेतला नाही. तपासाअंती चंकितचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आल्याने पोलीस कर्मचारी कदम यांच्या तक्रारीवरुन सिहोरा पोलिसांनी शेतमालक चैनलाल पटले यांच्याविरुध्द गुन्हा नोंद केला. याप्रकरणी पटले यांना अटक केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायले करीत आहे. (शहर प्रतिनिधी / तालुका प्रतिनिधी)
अखेर ‘त्या’ आरोपीला अटक
By admin | Published: April 13, 2017 12:28 AM