मुखरू बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: शेतकरी वर्गाच्या आक्रोशानंतर जिल्हा पणन कार्यालयाने शेतकरी वर्गाच्या खात्यात धानाचे चुकारे ऑनलाइन पद्धतीने जमा केली. थेट ३५-४० दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी वर्गाला धानाचा मोबदला मिळालेला आहे. शेतकरी वर्गाला निश्चितच दिलासा मिळालेला आहे.
भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकरीला मोठा आधार ठरलेला आहे. कदाचित आधारभूत धान खरेदी केंद्र सरकारने सुरू केले नसते तर, शेतकरी वर्गाला पडल्या भावात व्यापार्यांच्या दारात जाऊन धान विकावे लागले असते. मात्र हक्काचा आधारभूत केंद्र असल्याने शेतकरी वर्गाला धान विकण्यासाठी खरेदी केंद्राचा मोठा आधार मिळालेला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत धानाची खरेदी जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत सुरू केलेली आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत ही खरेदी चालणार आहे. धान खरेदी केंद्रावर आज ही खरेदी सुरू आहे. मोजणी करिता शेतकरीवर्ग दररोज धान खरेदी केंद्रावर हजेरी लावीत आहे. शासनाने ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. बोनस आपल्याला मिळावा या हेतूने व्यापाऱ्याला धान न विकता आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकरी हक्काने नोंदणी करून मोजणी करिता वेटिंग वर आहे. इतर पिकांचा विचार केल्यास भंडारा जिल्ह्यात धान पिकाला आधारभूत केंद्राचा आधार मिळाल्याने धानाचा शेतकरी शासना प्रति आभारी आहे.
भंडारा जिल्ह्यात ७३ धान खरेदी केंद्र अंतर्गत धान खरेदी सुरू असून यातील पालांदूर परिसरात ४ धान खरेदी केंद्र नियमित तेणे सुरू आहेत. पालांदूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अंतर्गत ९ नोव्हेंबर पासून धान खरेदी सुरू करण्यात आली. १२ डिसेंबर पर्यंत ७२३ शेतकऱ्यांचे २०४३१.२० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यांची रक्कम ३,८१,६५,४८१.६० रुपये एवढ्या रकमेपैकी ३७२ शेतकऱ्यांचे ११०२७.६० धान खरेदी क्विंटलची रक्कम २ करोड ५ लक्ष ९९ हजार ५५६ रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे. २९ नोव्हेंबर पर्यंत खरेदी झालेल्या धानाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम येणे शिल्लक आहे.
धान खरेदीची रक्कम ३७२ शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्याची आशा आहे. १८६८ रुपये या आधारभूत किमतीने धानाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेली आहेत.खरेदी नियमित सुरू असून पारदर्शक पद्धतीने जिल्हा पणन कार्यालयाशी ऑनलाइन पद्धतीने माहिती दिली जात आहे.
- विजय कापसे, अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पालांदूर.