१६ लोक ०३ के
तुमसर : येथील कोडवाणी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना उपचारार्थ भरती केलेल्या रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाइकांकडून मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी याकरिता शिवसेनेने तुमसर येथे धरणे आंदोलन सुरू केले. सात दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने तक्रारीची दखल घेतल्याने शिवसेनेच्या धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.
तहसीलदार यांनी मंगळवारी आंदोलन स्थळी भेट देऊन चौकशी समिती गठित झाल्याचे पत्र दिले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केले. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्याकरिता तुमसर येथील कोडवाणी रुग्णालयाला कोरोना रुग्णावर उपचार करण्याकरता परवानगी दिली होती; परंतु कोडवानी रुग्णालयात कोरोना परिस्थितीत उपचार घेण्याकरिता भरती झालेल्या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शिवसेनेचे शाखाप्रमुख अमित मेश्राम, जिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर व अन्य शिवसैनिकांनी रुग्णालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. रुग्णालयाकडून कोरोना रुग्णाकडून अधिकचे दर आकारण्यात आले. याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी शिवसेनेकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. अखेर प्रशासनाने जिल्हा स्तरावर चौकशी समिती नेमली. या समितीत उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
यात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पीयूष जक्कल, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बिसेन, सहायक लेखाधिकारी एस. डी. मिलमिले यांचा समावेश आहे.
सदर समिती कोडवानी रुग्णालयाचे संपूर्ण परीक्षण करणार असून, त्यांच्याकडील कोरोनाकाळात देण्यात आलेले उपचार त्याअनुषंगाने आकारण्यात आलेले दर व इतर सर्व बाबी या शासकीय निकषांच्या अधीन राहून आहे किंवा कसे याबाबत चौकशी करून संपूर्ण अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर करणार आहे. सदर चौकशी समितीचा अहवालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
सदर चौकशी समितीत शिवसेनेचा प्रतिनिधी किंवा प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करावा, अशी मागणी शिवसेनेचे अमित मेश्राम, जगदीश त्रिभुवनकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.