भंडारा व पवनी तालुक्यातील गोसे खुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र, गत सरकारने गोसे खुर्द उपविभागीय कार्यलाय नागपूर येथे स्थलांतर केले होते. भंडारा जिल्ह्यातील २५ हजार एकर जमीन पाण्याखाली गेली असून गोसे धारणा मुले १०४ गाव बाधित झाले आहेत. समस्यांचे निराकरण करण्यासाठी भंडारा येथे कार्यालय नसल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते.
ही बाब लक्षात येताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी पाठपुरावा सुरू केला. जलसंपदामंत्री जयंत पाटील भंडारा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांना निवेदन दिले होते. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत होता. माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल यांनी सहकार्य केले. अखेर भंडारालगतच्या अंबाडी येथे कार्यालय सुरू करण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.