शासनस्तरावर पाठपुरावा करणार : दरमहा एक हजार रूपये मदतीचे अभिवचन भंडारा : भारतीय सैन्यातून देशसेवा केलेल्या नान्होरी येथील केवळराम लोणारे यांना तुटपुंजे सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. शासनाने दिलेली शेतजमीनही शासनाने परत घेतली. तेव्हापासून ते शेतीसाठी शासनाशी लढा देत आहे. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारला प्रकाशित केले. याची दखल घेत भंडाराचे आमदार अॅड.रामचंद्र अवसरे यांनी स्वत:च्या वेतनातून लोणारे यांना दरमहा एक हजार रूपये देण्याचे अभिवचन दिले. आ.रामचंद्र अवसरे हे आज बुधवारला ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात भेट देऊन लोणारे यांना हजार देऊन पहिला मदतीचा हाथ दिला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांची भेट घेऊन लोणारे यांची आपबिती सांगितली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे कागदपत्र मागवून न्याय देण्यात येईल असे सांगितले.लाखनी तालुक्यातील नान्होरी येथील केवळराम लोणारे हे सन १९६२ मध्ये सैन्यात असताना पाकिस्तानशी झालेल्ळा युध्दाचे साक्षीदार आहेत. कालांतराने प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांच्या देशसेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना साकोली तालुक्यातील मोगरा येथे पाच एकर शेतजमीन दिली होती. मात्र, वनहक्क कायद्याखाली ती जमीन शासनाने परत घेतली. शासनाकडून त्यांना केवळ ८९२ रूपये सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. मागील ४३ वर्षांपासून शेतीसाठी ते शासनाशी लढत आहे. उदरनिर्वाह करताना त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतू त्यांना कुणाचेही सहकार्य मिळाले नाही. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाची वाताहत होत असल्यामुळे केवळराम यांनी ‘लोकमत’ कार्यालय गाठून आपबिती सांगितली. त्यानंतर ‘लोकमत’ने ‘माजी सैनिकावर गृहपयोगी साहित्य विकण्याची वेळ’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन आ. अॅड.रामचंद्र अवसरे यांनी ‘लोकमत’ला फोन करून केवळराम यांची माहिती जाणून घेतली व त्यांना आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली. बुधवारला सकाळी आ.अवसरे यांनी केवळराम यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शासनाकडून त्यांना शेतजमीन मिळवून देण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर लाखनीचे तहसीलदार पोहनकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर केवळरामची कैफियत सांगण्यासाठी त्यांना स्वत:चे वाहनात बसवून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष विकास मदनकर, शहर महामंत्री संजय मते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
अखेर ‘त्या’ माजी सैनिकाला मिळाला मदतीचा हात
By admin | Published: April 16, 2015 12:30 AM