प्रफुल पटेल यांच्या सूचनेवरून अंमलबजावणी
: बांधकाम विभागातील अधिकारी व स्ट्रक्चर ऑडिटरची उपस्थिती
तुमसर: बावनथडी नदीवरील पुलाला वाहतुकी दरम्यान
हादरे बसत असल्याच्या कारणावरून आंतरराज्यीय पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान पुलावरून हलके वाहनाची वाहतुक सुरू झाली असताना पुलावरून पुन्हा वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांत रोष होता. परिणामी पुलावर बॅरिकेडिंग उभारून ७ फूट उंचीच्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षकांना १६ मे रोजी आढावा बैठकीत दिले होते. त्यामुळे पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे.
२२ मे रोजी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता चुर्रे , कनिष्ठ अभियंता कडु, स्ट्रक्चर ऑडिटर व रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांच्या उपस्थितीत हलके वाहन दुचाकी, चारचाकी कार व रुग्णवाहिका करीता बावनथडी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या कटंगी मार्गावरील बावनथडी नदीवर १९८३ मध्ये या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. ३५ वर्षांपासून या पुलाची देखरेख झाली नाही. परिणामी पुलाला वाहतुकीदरम्यान हादरे बसत होते. सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यानी पुलावरील सर्व वाहतूक तडकाफडकी बंद केली होती. परिणामी २ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ५० किलोमीटरचा फेरा नागरिकांना घालावा लागत होता. पुलावरून कमीत कमी हलके वाहनांच्या वाहतुकीस परवानगी घ्यावी अशी मागणी आमदार राजू कारेमोरे सह तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी पालकमंत्री यांच्याकडे २६ जानेवारीला घेतलेल्या जनता दरबारात केली होती. त्यामुळे पुलावरून हलके वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पोलीस विभागाला त्या संदर्भात कसलेही पत्र प्राप्त न झाल्याने पोलिसांनी २० एप्रिलला संचारबंदी लागल्यानंतर पुन्हा पोलीस विभागाकडुन नाली खोदून पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. परिणामी कोरोना काळात दोन्ही राज्यातील नागरिक प्रभावित झाले असता खासदार प्रफुल पटेल १६ मे रोजी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या कामाची पाहणी व खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल करण्याबाबत आढावा बैठकीसाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ही बाब रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी खा. पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली. खा. पटेल यांनी कोरोना काळात आंतरराज्यीय मार्ग बंद न करता ७ फूट उंचीचे वाहन जाईल असे बॅरिकेडिंग उभारून हलके वाहनांची वाहतूक सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शनिवारी स्वतः अधिकारी व रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांच्या उपस्थितीत हलक्या वाहनांची वाहतूक सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.