दखल लोकमतची
जवाहरनगर : आयुध निर्माण कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जवाहरनगर भंडारा द्वारा संचालित पेट्रोल पंपचे छताचे काम, मागील दहा वर्षांपासून रखडले होते त्या अनुषंगाने लोकमत ने आपल्या वृत्तपत्रात वारंवार बातमी प्रकाशित केली. अखेर मंगळवार १५ जून रोजी छताच्या कामाला सुरुवात झाली.
भंडारा जिल्ह्यात आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्था
जवाहनगर भंडाराद्वारा सहकारी तत्त्वावर सुरू असलेली एकमेव पेट्रोल पंप आहे. सदर भारत पेट्रोल पंप हे राष्ट्रीय महामार्ग लगत आहे. हे ठिकाण वर्दळीचे असल्याने वाहनांची मोठी रांग असते. पूर्वी याठिकाणी छत व सुख सुविधा होती. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणामुळे येथील छत काढण्यात आले. याबाबत नव्याने छताचे व आवारात गट्टू व बगीचा बनविण्याचे काम मागील दहा वर्षांपासून रेंगाळलेले होते. याविषयी लोकमतने वारंवार ‘पेट्रोल पंपचे छत हरवले’. या आशयाची बातमी प्रकाशित केली. याठिकाणी रणरणत्या उन्हाच्या बचावासाठी येथील कर्मचारी, ग्रीन मॅट व पावसाळ्यात तरपाल बांधून आपली सोय करून घेतात. मात्र तुफानी वारा व वादळी पावसामुळे तात्पुरता निवारा उडून जातोय.
ग्राहक रणरणत्या उन्हाळ्यात व पावसाळ्यात खड्डेमय जागेतून प्रवास करून, पेट्रोल-डिझेल भरत असतात. परिसरात गटू उखडलेले आहेत. वाहनामध्ये हवा भरण्याची येथे सोय नाही. अर्धवट काम झाल्याने ग्राहकांची कुचंबणा होत आहे. याची वाचा लोकमत ते आपल्या दैनिकात प्रकाशित केली. याची दखल घेऊन संबंधित विभागाने छताच्या कामाला १५ जून रोजी सुरुवात झाली आहे.