अड्याळ : जिल्हा प्रशासनाने यावर्षीपासून पथदिवे देयकांचा भरणा करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असल्याच्या निर्णयाला राज्य शासनाने दुजोरा दिला. त्यामुळे दोन महिन्यापासून पथदिवे बंद होते. अखेर शुक्रवारी अड्याळ ग्रामपंचायतीने थकीत विद्युत बिलाचा भरणा चेक द्वारे केला. मात्र आता वीज वितरण कंपनीनेही थकीत कर ग्रामपंचायतीला जमा करावा, असा ठराव घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अड्याळ गावातील स्ट्रीट लाईट विद्युत बिलाचा भरणा न केल्याने विद्युत विभागाने तात्काळ बंद केली होती. यात आणखी महत्वाचे म्हणजे यापुर्वी हेच विद्युत बिल जिल्हा परिषदमार्फत भरले जायचे, पण नियमावलीत बदल झाल्याने आता तोही भार प्रत्येक ग्रामपंचायतच्या माथी पडला आहे. गत दोन दिवसांआधी माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांनी ग्रामस्थ तथा सर्पमित्र ,फ्रेंडस गृप, स्वरक्षण टीमच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पथदिवे बंद असल्याविषयी तथा विविध मागण्या संदर्भात चर्चा करून निवेदन दिले होते.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास अड्याळचे सरपंच तथा सदस्यांनी विद्युत उपकेंद्र अड्याळ येथे जाऊन थकीत विद्युत बिलाचा भरणा चेक द्वारे केला. यावेळी सहाय्यक अभियंता सचिन चापेकर यांनी सायंकाळी पथदिवे सुरु होणार असे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायतने पलटवार करत एक निवेदनही दिले. त्यात महावितरण कंपनीवर गत २० वर्षांपासूनची कर आकारणी केली गेली नाही आणि त्याची आत्तापर्यंतची १८ लाख ५० हजार रुपये थकबाकी होत आहे. आता ग्रामपंचायतने ते कर घेण्यात यावे, असा ठराव मासिक सभेत घ्यावे, असेही विद्युत उपकेंद्र अड्याळमार्फत वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. महत्वाचे म्हणजे पावसाचे दिवस,त्यातही सरपटणारे प्राणी आणि जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायतने पथदिव्यांचे विद्युत बिल भरली नाहीत म्हणून तब्बल दोन महिन्यांपासून पथदिव्यांची विद्युत पुरवठा खंडित होऊन गावात सगळीकडे अंधार असल्याने भीती युक्त वातावरण, याला सामान्य ग्रामस्थ काय करणार?, अशावेळी गावातील ग्रामस्थ तथा सर्पमित्र, फ्रेन्ड्स गृप तथा स्वरक्षण टिमने पुढाकार घेऊन गावातील समस्या विषयीची चर्चा बैठक लावून त्यात माजी शिक्षण राज्यमंत्री विलास शृंगारपवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक विषयांवर चर्चा होऊन निवेदन देण्यात आले होते.