लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या सहकार्याने सुरू केलेल्या साखळी उपोषणाची जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. या प्रकल्पाचे पाणी भंडारा तालुक्यातील अखेरच्या टोकापर्यत पोहचल्याने साखळी उपोषण मागे घेण्यात आले.शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करून उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष बैठकीत सांगितले.पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असलेल्या भंडारा तालुक्यातील शेतीकरिता या प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात सातत्याने आंदोलन करण्यात आले. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी पेंच प्रकल्पाचे पाणी तातडीने सोडण्याचे आश्वासन दिले. परंतु, भंडारा तालुक्याला पेंच प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळाला नाही. परिणामी, गुरूवार ११ आॅक्टोबरपासून सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी भंडारा येथे पांढराबोडी रस्त्यावरील किसान चौकात साखळी उपोषण सुरू केले. १७ आॅक्टोबरपर्यत उपोषण करून १८ आॅक्टोबर रोजी विजयादशीच्या दिवशी पेंच प्रकल्पाचे पाणी असलेल्या एखाद्या नहरात सामूहिक जलसमाधी घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.दरम्यान, पेंच प्रकल्पाच्या पाण्यासाठी आंदोलन अधिकच तीव्र होत असल्याचे पाहून, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी शंतनु गोयल यांनी तातडीची बैठक आयोजित करून नरेंद्र भोंडेकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले. भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी पोहचविण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याअभावी झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून अल्पावधीत पंचनामे करण्यात येतील, या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा नियमीत लाभ घेता यावा, याकरिता दाभा-टाकळी येथील नियोजित उपसा सिंचन योजनेचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यात येईल, यापूर्वी खुर्शीपार आणि मुजबी येथे आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पेंच प्रकल्पाचे पाणी तालुक्यात पोहचल्याने तसेच इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने साखळी उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरूवारीच सायंकाळी किसान चौकात पोहचलेले तहसीलदार अक्षय पोयाम यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू पाणी देवून साखळी उपोषण सोडविले. याप्रसंगी परिसरातील शेतकरी तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखेर पेंच प्रकल्पाचे पाणी पोहचले शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:39 PM
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह इतर मागण्यांच्या समर्थनार्थ ...
ठळक मुद्देशिवसेनेच्या आंदोलनाचे यश : विजयादशमीला सामूहिक जलसमाधीच्या इशाऱ्यानंतर साखळी उपोषणाची सांगता